पुणे मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या लाँचिंग गर्डरची उभारणी

0
350

पिंपरी दि.२३ (पीसीबी)-हिंजवडी आयटी पार्क आणि नजीकच्या परिसरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय करण्यासाठी आणि शाश्वत शहरीकरण सक्षम करण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने हिंजवडी ते शहराचे केंद्र शिवाजीनगरला जोडणारी “पुणे मेट्रो लाइन – 3” – मास रॅपिड ट्रान्झिट (Mass Rapid Transit) अंतर्गत सदर प्रकल्पाचे काम राज्य शासनाच्या मान्यतेने हाती घेतले आहे. सदर मार्गिका माण, हिंजवडी येथून सुरू होऊन वाकड, बालेवाडी, बाणेर, विद्यापीठ चौकातून शिवाजीनगर येथे जाऊन जिल्हा व सत्र न्यायालय पुणे पर्यंत आहे. सदर उन्नतमार्ग मेट्रो ची लांबी २३.२०३ कि.मी. असून सदर मार्गिकेत 23 स्टेशन्स आहेत. सदर प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्त्वावर संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (DBFOT) मॉडेल अंतर्गत हाती घेण्यात आला आहे आणि ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स जीएमबीएच यांच्या संयुक्त संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. सदर प्रकल्प हाती घेण्यासाठी विशेष उद्देश वाहन ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ ची स्थापना करण्यात आली आहे. सदर मेट्रो ची design क्षमता ३०,००० पीक अवर पीक डायरेक्शन ट्रॅफिक एवढी आहे. सदर प्रकल्पाची किंमत (भूसंपादन, सेवा वाहिनी स्थलांतर करणे इ. खर्चासह) रु. ८३१३ कोटी एवढी आहे.

पुणे मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या व्हायाडक्ट सेगमेंटच्या (Viaduct Segments) उभारणीचा उद्घाटन कार्यक्रम आज प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते मेगापोलिस सर्कल, हिंजवडी आयटी पार्क, फेज ३ येथे संपन्न झाले. मेट्रोच्या खाम्ब्यांची (Piers) ची उभारणीनंतर लाँचिंग गर्डर दोन खाम्ब्यांवर उभारले जाते आणि त्यानंतर व्हायाडक्ट स्पॅन (Span) तयार करण्यासाठी सेगमेंट्स (Segments) उभारले जातात. स्पॅनची लांबी २५ ते ३४ मीटर असणार आहे, त्याचे वजन सुमारे ५०० टन इतके आणि प्रत्येकी २ ते ३ मीटर रुंदीचे ८ ते १२ प्रीकास्ट (Precast) सेगमेंट जोडून एक स्पॅनची तयार होणार आहे. या प्रत्येक सेगमेंट्चे वजन सुमारे 45 टन आहे. हे सेगमेंट्स यशदा, ताथवडे येथील प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डमध्ये प्री-कास्ट केले जात आहेत. या प्रकल्पामध्ये संपूर्ण मार्गासाठी सुमारे ८१२ स्पॅन असून ८३८९ सेगमेंट्स असणार आहेत. एकूण ७ लाँचिंग गर्डर्सच्या मदतीने दर महिन्याला सुमारे १ कि.मी. लांबीचे व्हायाडक्ट उभारले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात १००० पाईल फाऊंडेशनचे (Pile Foundation) काम पूर्ण झाले असून पाईल कॅप (Pile Cap), पिअर (Pier) आणि इतर कामे कामे उच्च प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत.
“हा प्रकल्प जलदगतीने हाती घेतला जात आहे आणि मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे”, श्री विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पु.म.प्र.वि.प्रा. यांनी कार्यक्रमात सांगितले.

तसेच, विद्यापीठ चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाने एकात्मिक दुम्मजली उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत, सदर चौक हे पुणेतील सर्वात व्यस्त चौकापैकी एक असल्याने, प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स-फायबर-प्रबलित-काँक्रीट (Ultra High Performace Fiber Reinforceed Concrete – UHPFRC) ह्या तंत्रज्ञान वापरणे प्रस्तावित आहे जेणेकरून रस्त्याचा मध्यभागी कमीत कमी खांब असतील आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. २२/०२/२०२२ रोजीच्या परिपत्रकाद्वारे उड्डाणपूल बांधकामासाठी उक्त UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

श्रीमती. रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए, श्री भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, पीएमआरडीए, श्री विनायक पाई, व्यवस्थापकीय संचालक, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, श्री आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीआयटीसीएमआरएल, श्री राघवेंद्र भट, टीम लीडर, तटस्थ अभियंता इ. अधिकारी / अभियंता सदर कार्यक्रमास उपस्थित होते.