पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार…मुख्यमंत्री शिंदे यांची पहिलीच मोठी घोषणा

0
382

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिलीच मोठी घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेणार असल्याची मोठी घोषणा शिंदे यांनी विधीमंडळात केली. मंत्रीमंडळ बैठकित हा निर्णय होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.