“तंगा मंगा ना दंगा” धमाल विनोदी अहिराणी लोकनाटय दुस-या प्रयोगाचे सादरीकरण
पिंपरी,दि.३(पीसीबी) : समाजात बोली भाषेतून माणसांची ओळख निर्माण होते. प्रदेश, शिवार बदलले की भाषा देखील बदलत असते. मात्र, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या शहरीभागात खान्देशातील मायबोली अहिराणी भाषेचा जागर होत असून अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश पाटील यांनी केले. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असतो. काही दशकांपासून खान्देशातील ग्रामीण भागातून शहरांमध्ये नोकरी व कामानिमित्त वास्तवात आलेल्या बांधवांनी अहिराणी भाषा कायम जिवंत ठेवली आहे, त्याचे आता पुस्तक रुपी संवर्धन होत असल्याचेही ते म्हणाले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी स्वर्गीय महेंद्र दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ जलरंग तापी नाटय संस्था मुंबई निर्मित “तंगा मंगा ना दंगा” या धमाल विनोदी अहिराणी लोकनाटयाचा दुसरा प्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी श्री. राजेश पाटील बोलत होते. यावेळी, मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माहेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती ढाके, लोकनाट्याच्या निर्मात्या संगीता कुलकर्णी हटकर, लेखक देविदास हटकर, दिग्दर्शक मनोहर खैरनार, मनिषा पाटील, ज्येष्ठ अहिराणी साहित्यीक बापूसाहेब पिंगळे, उद्योजक शरद पाटील, किरण चौधरी, पंकज निकम, खान्देश मराठा मंडळाचे संचालक भास्कर पाटील, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णांच्या काळापासून अहिराणीला महत्व प्राप्त झाले आहे. अभ्यासक, साहित्यिकांनी देखील संशोधनासाठी अहिराणीकडे मोर्चा वळविला आहे. पटनाटय, पुस्तके, गीतांमधून महाराष्ट्रातच नव्हे तर जागतिकस्तरावर सुध्दा अहिराणी भाषा प्रचलित होत असल्याचे मत मा. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सूरूवात करण्यात आली. तसेच, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा घेण्यात आला.
दरम्यान, “तंगा मंगाना दंगा” या साडे तीन तासाच्या धमाल विनोदी अहिराणी लोकनाटय प्रयोग सादरीकरणातून भगवान श्रीकृष्णाच्या वेशभुषेत कलाकारांनी विविध नाट्यछटा द्वारे अहिर राजा ते आजचा खान्देश असा संगीत, नृत्य, किर्तनातून अहिराणी भाषेच्या इतिहासाचे वर्णन केले. या नाट्यप्रयोगात प्रेक्षकांनी मोठया संख्येने टाळ्यांच्या गजरात दाद देवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अखिल खान्देश युवा प्रतिष्ठान व खान्देश सांस्कृतिक विकास संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, सरचिटणीस कैलास रोटे, मंडल सरचिटणीस प्रदीप पटेल, रुपेश पाटील, शुभम ढाके, प्रदीप नेहते, कुणाल इंगळे, मोतीलाल पाटील, सचिन महाले, धीरज धाकड यांच्यासह विविध संघटना व महिला बचत गटांचे पदाधिकारी यांनी संयोजनात सहभाग घेतला. सुत्रसंचालन जितेंद्र चौधरी यांनी केले.