मुंबई, दि. ३ (पीसीबी) : अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीत भाषण करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसकर, इतर बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, ” ”कशामुळे घडले? काय घडले? हे एकनाथ शिंदेंनी मला कानात जरी सांगितले असते आणि मुख्यमंत्रीपद हवे असे म्हटले असते तर मी उद्धव ठाकरेंना बोलून त्यांना मुख्यमंत्री केले असते.”
पवारांच्या या वाक्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. सभागृहाचे नवीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधत अजित पवार म्हणाले, “सर्वच पक्षात राहूल नार्वेकर यांनी उत्तम काम केले. एका गोष्टीचे मनापासून कौतूक आहे की नार्वेकर ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या नेतृत्वाला आपलेसे करीत असतात. शिवसेनेत आदित्य, राष्ट्रवादी मला आणि भाजपमध्ये फडणविसांना नार्वेकरांनी आपलेसे केले. हयगय केली नाही आता एकच की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपलेसे करावे अन्यथा त्यांचे काही खरे नाही.”
भाजपच्या जुन्या, जाणत्या माणसांची संधी गेली. भाजप सत्तेत येण्याची शक्यता नव्हती पण मोदींची जादू चालली आणि भाजप सत्तेत आला. मुळचे भाजपचे मान्यवर समोरच्या बाकावर कमी आणि आमचेच लोक जास्त दिसतात. मूळ भाजपच्या लोकांना पाहून वाईट वाटते. कारण त्यांना बाजूला सारून भाजपमध्ये गेलेल्या आमच्या बहुतांशी मंडळींनी पदे पटकावली, असा टोला मारताच पुन्हा सभागृहात हशा पिकला.
सभागृहात मुख्यमंत्र्यांमागे बसलेले दिपक केसरकर उत्कृष्ट प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्ही शिकवलेले वाया गेले नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी केसरकर यांना टोला मारला.