थर्ड आय – अविनाश चिलेकर –
राजकारणात काहीच खरे नसते, सर्व अनिश्चित असते. काल गळ्यात गळे घालणारे मित्र रात्रीतून एकमेकांचे हाडवैरी होतात. उजवे-डावे असे काहीच राहिलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते चालते. सत्व, तत्व, न्याय, निती सगळा खेळ झालाय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच आता राजकारणाचे खरे गृहितक बनले आहे. राजकीय स्वार्थासाठी बंडखोरी म्हणा की गद्दारी, आता नित्याची बाब आहे. नेते, कार्यकर्ते सगळे एका माळेचे मणी. मोदींकडे पाहून लोक भाजपाकडे झुकले. आता सत्तेच्या लालसेपोटी भाजपानेही सोवळे गुंडाळून ठेवले आणि तत्वांनाही मूरड घातली. महाराष्ट्रात गेले दहा दिवस जे काही सत्तांतर नाट्य सुरू आहे ते त्याचे एक जाज्वल उदाहरण आहे. ईडी, सीबीआय, आयटी रेड मधील खासदार-आमदारांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सगळेच सोडून दिलयं. मोदींनी काँग्रेस जवळपास संपवली आहे, त्यामुळे मरनासन्न काँग्रेस आता हिशेबात राहिलेली नाही. एकूणच देशाचे, राज्याचे राजकारण किती रसातळाला गेले आहे, ते पाहून लोकसुध्दा त्रस्त आहेत.
असंगाशी संग मृत्यूशी गाठ –
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत शिवसेना फुटली किंवा शिंदे गटाने बंडखोरी केली आहे, असे म्हणण्यापेक्षा, भाजपाने आख्खी सेनाच गिळंकृत केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ठाकरे कुटुंबाने सेना जेव्हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली तेव्हापासून सेनेचे पतन सुरू झाले. असंगाशी संग मृत्यूशी गाठ असे म्हणतात अगदी तसे झाले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राष्ट्रवादीबद्दल लोकभावना तीव्र आहेत. दोन मंत्री कोठडित, चार ईडीच्या रांगेत हे खटकते. शिवसेनेचे मंत्री, नेते, आमदार, खासदार यांच्या ईडी कडे असलेल्या भानगडी आणि डझनभर नावे, शेकडो कोटींच्या जप्त मालमत्तांची यादी हे सगळे चित्र अगदी भेसूर आहे. भले ते राजकीय सुडापोटी असेल, पण प्रामाणिक माणसाला या सर्व बातम्या वाचून ती पार्टी आणि ते नेते अक्षरशः डोक्यात जातात. पवार-ठाकरेंचे सरकार आज ना उद्या जावे यासाठी भाजपा अटोकाट प्रयत्न करत होती, पण जनतेचेही तसे मत तयार झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांना एका एका प्रकरणाचे लंगडे समर्थन करता करता नाकी नऊ आले. संजय राऊत यांनी आकाश पाताळ एक करून भाजपावर आसूड ओढले, पण ईडी ने केलेल्या आजवरच्या सर्व कारवाईचा समधानकारक खुलासा त्यांनाही करता आलेला नाही. ४० आमदारांनी राष्ट्रवादीची संगत सोडा चा धोशा लावला कारण आगामी २०२४ च्या निवडणुकित त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यांच्या मतदारसंघाच राष्ट्रवादीने ताकदिचे स्पर्धक तयार केल्याने पुन्हा निवडूण येण्याची शाश्वती त्यांना नाही. आमदारांच्या पाठोपाठ १२ खासदारांनीही शिवसेना भाजपा बरोबर गेली तरच भवितव्य असल्याचे म्हटले. अशा प्रकारे आर्धीअधिक शिवसेना ठाकरेंना मिनतवारी करते पण पवार यांची साथ ते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे सेनेचे जहाज बुडाणार की काय अशी स्थिती आहे. आमदारांचे दोन्ही बाजुचे संख्याबळ पाहिले तर गुरुवारी बहुमत चाचणीत ठाकरे सरकार गडगडणार हे जवळपास निश्चित. देवेंद्र फडणवीस लगोलग १ जुलै ला शपथ घेणार आणि नवीन सरकार येणार. या सर्व घडामोडींचा परिणाम ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिकांवर होणार आहे.
पिंपरी चिंचवड पुन्हा भाजपाकडे जाऊ शकते –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेले पिंपरी चिंचवड शहर २०१७ मध्ये भाजपाने खेचून घेतले. १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपाचे झाले आणि शहर भाजपामय झाले. पाच वर्षांत भाजपावर भ्रष्टाचाराचे शेकडो आरोप झाल्याने लोकमत पुन्हा राष्ट्रवादीकडे झुकले होते. भाजपाचे ४२ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश कऱण्याच्या तयारीत होते. रवि लांडगे, वसंत बोराटे, माया बारणे, चंदा लोखंडे या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि अनेकजण रांगेत होते. अजित पवार शहरात तीन वेळा आले त्यावेळी पुन्हा खचाखच गर्दीचा विक्रम झाला आणि राष्ट्रवादीच उत्साह संचारला होता. भाजपा भ्रष्टाचाराच्या विरोधातील राष्ट्रवादीचा मोर्चा अभूतपूर्व झाल्याने उमेदवारी पाहिजे असणारे शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या मागे आले. गेल्या दहा दिवसांत राज्यात पुन्हा सत्तांतराचे वारे वाहू लागले आणि पिंपरी चिंचवड शहराचाही नूर पालटला. अशातच उमा खापरे यांच्यासारख्या सर्वसामान्य निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्याला विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळाल्याने भाजपाचा उत्साह दुनावला. आमदार महेश लांडगे यांच्याकडे स्वतः फडणवीस यांनी सत्तांतर नाट्यातील काही जबाबदारी सोपविल्याने त्यांना हत्तीचे बळ आले. उद्या भाजपाचे सरकार आले तर आमदार लांडगे यांना मंत्रीपद मिळू शकते याची शाश्वती वाटू लागली. वारे भाजपाच्या दिशेने वाहते म्हटल्यावर पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली. जे ४२ नगरसेवक भाजपातून राष्ट्रवादीत येणार होते त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. फडणवीस आले तर आता ते किमान १०-१५ वर्षे हालत नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी नकोच अशीही भावना तयार झाली. इतकेच नाही तर राष्ट्रवादीतील काही दिग्गज आता भाजपामध्ये जाऊ शकतात अशीही नवीन शक्यता निर्माण झाली. जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो अशी म्हण इथे लागू पडते. राष्ट्रवादी सत्तेत येऊ शकते असे वाटले तेव्हा लोंढा अजित पवार यांच्या मागे गेला, आता बाजी पडलटी असे दिसताच भलभले राष्ट्रवादीचे नेते भाजपाकडे तोंड फिरून बसलेत. सगळा सत्तेचा समत्कार आहे.
भाजपा सत्तेत आल्यावर आताची तीन सदस्यांची प्रभाग रचना पुन्हा चार सदस्यांची होऊ शकते, अशीही चर्चा सुरू झाली. प्रभाग रचना राष्ट्रवादला साजेशी असल्याने ती भाजपासाठी सोयिस्कर व्हावी म्हणून पुन्हा प्रयत्न होणार हे ओघानेच आले. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने १० मार्च नंतरची परिस्थिती जशी होती तेथून पुढे काम सुरू करा, असे आदेश दिल्याने आता अंतिम प्रभागरचना, मतदारयाद्यांसह सगळे काम जवळपास संपले आहे. अशात पुन्हा सगळी चक्रे उलटी फिरून प्रभाग रचना बदलतीलच, असेही संभवत नाही. शिवसेनेचे बंड भाजपाच्या पथ्यावर पडणार नव्हे तर आता सत्तेचा सातबारा भाजपाच्या नावे होणार आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना ८५ आणि भाजपा ८२ असे २०१७ चे संख्याबळ होते, आता भाजपा १०० च्या पुढे आरामात जाऊ शकते. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा प्राण आहे. ती महापालिका गेली तर सेना खचणार आहे. जे भाजपाला हवे तेच होणार. पुणे महापालिका ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न तितकेसे सोपे नाही. थोडक्यात भाजपाचे दिवस पालटलेत. फडणवीस यांचे रामराज्य येणार, फडणवीस पुन्हा येणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.












































