पावसाळ्यात पथदिवे खांब, फिडरपिलरला स्पर्श करु नका, महापालिकेचे आवाहन

0
246

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला व फिडरपिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये. अशा विविध प्रकारच्या कृत्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका विद्युत अभियंत्यामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पथदिव्यांच्या खांबांची तपासणी करून ते सुव्यवस्थित करण्यात आले आहेत. विजेच्या खांबाला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक खांब, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास नागरिकांनी महापालिकेच्या दुरध्वनी व संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन देखील आयुक्त पाटील यांनी केले.

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता महापालिकेमार्फत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. महानगरपालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यामार्फत शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पथ दिव्यांच्या सर्व खांबांची तपासणी करण्यात आली आहे. धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळुन येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या कामांमध्ये काही उणीवा, त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी ६७३३३३३३, सारथी हेल्पलाईन.-८८८८००६६६६ या संपर्क दुरध्वनीवर किंवा सारथी ऑनलाईन तक्रार नोंदणी[email protected] या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी, असे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संदेश चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेकडून कडुन इमारती व दिवाबत्तीच्या खांबांमधून प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केला जातो. तरी नागरिकांनी सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत य़ंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला आणि फिडर पिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये, जनावरे खांबांना बांधु नयेत, जंक्शन बॉक्सवर पाय ठेवुन खांबावर चढु नये, कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधु नये, बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये, खांबांना फ्लेक्स, होर्डिंग्ज बांधु नये, कोणत्याही प्रकारची केबल अथवा तार खांबावरुन ओढु नये. निर्देशित केलेल्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झाल्यास महानगरपालिका अशा घटनेस जबाबदार रहाणार नाही, असे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संदेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.