वेबसाईट वरून कर्ज घेण्याबाबत चौकशी करणे पडले महागात

0
307

हिंजवडी दि. १९(पीसीबी) –
वेबसाईटवरून कर्ज घेण्यासाठी एका महिलेने ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले. महिलेला कर्ज न देता कर्ज दिले असल्याचे सांगत अज्ञातांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो बनवून तिच्या ओळखीच्या लोकांना पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार रविवार (दि. १२) ते मंगळवार (दि. १४) या कालावधीत घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि. १७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९९५७९२४६८२, ९४७६००८१७८२, ८२३४०८४८२७, ९१२३२६७२८४, ९५१६०१५९०१, ९४७०५१७८५९३, ८१४९८७७८७९, ९४७८९५२४०८६ या क्रमांकावरून बोलणा-या अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने यश कॅश या वेबसाईटवर कर्ज घेण्यासाठी व्हेरिफिकेशन केले. त्यानंतर त्यांना अज्ञाताने फोन करून ‘तुम्ही आमच्याकडून पाच हजार रुपये कर्ज घेतले आहे. ते परत करण्याची वेळ आली आहे. जर लोनची रक्कम परत केली नाही तर तुमचे अश्लील फोटो ओळखीच्या लोकांना पाठवून बदनामी करण्याची आरोपीने धमकी दिली.
आरोपीने फिर्यादीचा फोटो मॉर्फ करून त्यांच्या व्हाट्सअपवर पाठवला. त्यानंतर तो फोटो फिर्यादीच्या ओळखीच्या एका व्यक्तीला पाठवून त्यांची बदनामी केली. फिर्यादीचा आरोपीने ऑनलाईन माध्यमातून पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.