अजितदादांचा अवमान, मोदी अन् फडणवीस…थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
622

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूच्या शिळा मंदिर कार्यक्रमात भाषण करु दिले नाही म्हणून मोठा गदारोळ सरू आहे. विशेष म्हणजे नेहमी पालखी असो वा तुकाराम बिज पालकमंत्री तसेच स्थानिक खासदार, आमदार पुढे पुढे असतात. यावेळी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांनाही निमंत्रण नव्हते. दुसरीकडे मुख्य सोहळ्यातील मंचकावर विधानसभेचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले हे तिघे मोदींच्या शेजारीच बसले होते. मोदी आणि फडणवीस यांचा फक्त नामोल्लेख झाला तर उपस्थितीतांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अजित पवार यांचे नाव पुकारले तेव्हा सभा चिडीचूप होती. सभेच्या उपस्थितांमध्ये ७०-८- टक्के भाजपाचेच नेते, कार्यकर्ते उपस्थित होते, कारण त्यांनाच पासेस वाटले होते. आमदार महेश लांडगे यांच्याकडून कार्यकर्त्यांना मोबाईलवर जे निरोप गेले त्यात वारकऱ्यांच्या गणवेशात यावे, असे स्पष्ट सांगितले होते. देवस्थानचा कार्यक्रम होता, पण मंडपासह खर्चाची मोठी जबाबजारी भाजपाचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडेच होती. हे सगळे पाहिल्यावर प्रश्न असा पडतो की हा संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम होता की भाजपाचा मेळावा. आपले सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी येणार म्हणून भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते येणार हे समजू शकते. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या आपल्या विरोधकांना जाणीवपूर्वक डावलून भाजपाने हा सोहळा हायजॅक केला. लोकांना ते खूप खटकले. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना भाषण करु दिले पाहिजे होते. फडणवीस यांचे भाषण संपताच सूत्रसंचालन कऱणाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पुकारले तेव्हा स्वतः मोदींनी अजित पवार यांचे भाषण का नाही, असा सवाल फडणवीस यांच्याकडे पाहूण केला. मोदी यांना प्रोटोकॉल समजतो म्हणून त्यांनीच पवार यांनी बोलावे यासाठी विचारणा केली. अजित पवार यांनी विनम्रपणे नकार देत, आता पंतप्रधान मोदी यांनी बोलावे म्हणून हात पुढे केले. दोघेही मोठ्या मनाचे नेते, दोघांनाही सांभाळून घेतले. पण हे राजकारण राष्ट्रवादीला आणि पवार समर्थकांना मनाला लागले. खासदार सुप्रा सुळे यांनी ट्विट केले आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रीया दिली. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस नेत्यांनीही पवार यांना बोलू न देण्याच्या विषयावर भाजपाला टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिनीट टू मिनीट प्रोग्रॅममध्ये पवार यांच्या भाषणासाठी वेळच नव्हती. पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयाने अजित पवार यांच्या भाषणासाठी वेळ द्यावा, असे पीएमओ ला कळविले, पण स्पष्ट नकार आला. खरे तर, सुप्रिया सुळे यांनी किंवा स्वतः अजित पवार यांनी त्याचवेळी या विषयावर वाच्यता केली पाहिजे होती. राजकारण कोणी केले. दादांचा अवमान कोणी केला, संस्थान किती दोषी, संयोजकांनीच ही खेळी केली काय किंवा अजित पवार यांनी भाषणातून राजकिय चिमटे काढले तर कार्यक्रमाचा नूर पालटेल म्हणून फडणवीस यांनीच त्यांचे नाव वगळायला सांगितले असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

शासकिय कार्यक्रम नसल्याने प्रोटोकॉलचा प्रश्नच नाही –
खरे तर, हा शासकिय कार्यक्रम नव्हताच, तो पूर्णतः देहू संस्थानचा होता. संस्थानच्या निमंत्रणाला मान देत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आले होते. निमंत्रण देताना भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी विशेष पुढाकार घेतला म्हणून एकवेळ त्यांची उपस्थिती मंचकावर समजू शकते. मोदी यांच्या आगमानापासून ते निरोप देईपर्यंत भोसले हेच मोदी यांच्या पुढे-मागे संगतीला होते. मंचकावर भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती हीच आक्षापार्ह होती. भाजपाचे नेते असलेले फडणवीस, पाटील, भोसले हेच सर्व कार्यक्रमाचे कारभारी असल्यासारखे होते. त्यामुळेच की काय हा सर्व कार्यक्रम भाजपाचा वाटत होता. मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके हे मंचकावर असते तर, समतोल साधला असता. अन्यथा मोदी वगळता भाजपाचा एकही नेता मंचकावर नको होता. शिळा मंदिराची उभारणी ही राज्य सरकार, स्थानिक लोकप्रतिनीधी आणि संस्थानच्या मदतीने झाली, पण श्रेय भाजपावाले घेऊन गेले. एका स्वप्नवत सुंदर सोहळ्याला राजकिय रंगरंगोटी झाली कारण भाजपाचे नेते, कार्यकर्ते. सर्वाधिक दोष भाजपाचाच आहे. दोष फडणवीस यांचा आहे, तसा पाटील आणि भोसले यांचासुध्दा आहे. देहू संस्थानच्या विश्वस्थांचेही या कार्यक्रमावर कोणतेही नियंत्रण नसल्याने देखण्या सोहळ्याला कुठेतरी एक ढब्बा लागला. पंतप्रधान यांच्या कार्यालयातूनच अजित पवार यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याने यात संयोजक, सूत्रसंचालक यांची अवस्था आयत्यावेळी अवघडल्यासारखी झाली होती. मुळात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याबाबत कुठेही खटकले आहे, असे आतापर्यंत दिसलेले नाही. अजित पवार बोलणार सुध्दा नाहीत, कारण ते भाजपाच्या दबावाखाली आहेत. ईडी ने हजार कोटींचा मालमत्ता जप्त केल्याने त्यांचे तोंड बंद आहे. राज्यसभेला जे अपक्ष महाआघाडीतून फुटले आणि भाजपाला मिळाले तेसुध्दा अजितदादांचे समर्थक आहेत. शिवसेनेचा गेम करणारे पडद्यामागचे खरे सूत्रधार अजित पवारच आहेत, अशीही चर्चा आहे. पुणे विमानतळावर स्वतः पंतप्रधान अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवत आस्थेने विचारपूस करतात. अजितदादांनी परत भाजपाकडे यावे आणि सरकार करावे, असे जाहीर आवाहन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देतात. फडणवीस सतत अजित पवार यांच्या संपर्कात असतात. सगळे राष्ट्रवादीचे नेते भाजपावर तुटून पडतात, पण अजित पवार चकार शब्द भाजपाबद्दल बोलत नाहीत. सगळी परिस्थिती अत्यंत बोलकी आहे. दोन ओळी मधले ज्याला वाचता येते तो या सर्व हालचालींचा अर्थ समजू शकतो. सुप्रिया सुळे यांनी कंठशोष केला, पण दादांनी चुप्पी साधली आहे. खरे तर, संस्थानचा कार्यक्रम असल्याने राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांना बोलू दिले पाहिजे. इथे शासकिय कार्यक्रम असता तर प्रोटोकॉल किंवा मराठीत राजशिष्टाचार चा विषय येतो. खासगी संस्थेच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा प्रश्न तसा उद्भवत नाही. देहू संस्थांनला कार्यक्रमाच्या मंडपासाठी भाजपाच्या माजी आमदारांची मदत घ्यावी लागते हीसुध्दा शोकांतिकाच आहे. देहू संस्थान तसे `श्रीमंत` पाहिजे, पण त्यांना हात पसरावे लागतात. खरे तर, या निमित्ताने आता संस्थानचा ताळेबंद समाजासरमो मांडला पाहिजे. धर्मादाय आयुक्तांनी शेकडो एकर जमीन संस्थानच्या ताब्यात होती ती आजवर कोणी कोणी, कशी हडपली म्हणा की बिल्डरला विकली त्याची सखोल चोकशी केली पाहिजे. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे विचारधन जग आचरणात आणतो. संस्थान त्याबाबत कंगाल आहे. मोदी यांना सत्कारासाठी द्यावयाच्या तुकाराम पगडीवर पहिला अभंग होता, `भले तरी देऊ कासेची लंगोटी अन् नाठाळाच्या माथी हाणू काठी` असा अभंग लिहीला होता. त्याचा अंमल करण्याची वेळ आली आहे.

मोदींचे भाषण अप्रतिम, वारकी खूष –
सोहळ्यातील मानापमानाचा एक मुद्दा वगळला तर याची देही याची डोळा, असा एतिहासिक कार्यक्रम झाला. प्रथमच देशाचे पंतप्रधान देहूत आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊन तासाचे भाषण हा वक्ता, नेता कसा असावा याचा एक अप्रतिम नमुना होता. संत तुकारामांच्या उच्च निच्च तारिले भगवंते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असाध्य ते साध्य करिता काया अशी अभंगांचा भाषणातून चपखल वापर करणारे मोदी तमाम वैष्णवांना खूप खूप भावले. भाषणाच्या सुरवातीला व शेवटी रामकृष्ण हरी आणि, हर हर महादेव या घोषणांमुळे तमाम भागवतभक्तांना मोदी आपले वाटले. संत तुकाराम महाराजांचे विचारधन किती मोलाचे होते ते मोदी जितके जाणतात तितके महाराष्ट्रातील एकही नेता जाणत नाही, हेसुध्दा त्रिवार सत्य आहे. देशातील आजवरच्या एकाही पंतप्रधानाने देशाच्या आद्यात्मिक क्षेत्रांचा त्यांच्या भाषणात उल्लेख करून देशाची महती सांगितलेली कुठेही वाचली नाही, जे मोदींनी सांगितले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे लेखन करणारे जवळच्या सुदूंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांनाही मोदी नमन करतात. स्वातंत्रवीर सावरकर जेलमध्ये असताना बेड्यांचीच चिपळी करून संत तुकारामांचे अभंग म्हणत हे किती वारकऱ्यांना माहित होते, ते मोदींनी सांगितले. एक नक्की, असे वारकरी सांप्रदायासमोरचे समयोचित भाषण ना शरद पवारांचे एकले ना अजितदादा पवार यांचे. त्यामुळे जे काही झाले, ते बरेच झाले असेही लोक म्हणतात.