अजित पवार यांनी पुन्हा भाजपा सोबत यावे – माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ऑफर

0
532

अहमदनगर, दि. १३ (पीसीबी) – राज्यात सध्या जोरदार सत्ताकारण सुरू आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांचे एकमेकांवर पलटवार, शह-प्रतिशह सुरू आहेत. अशातच भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक विधान चांगलंच चर्चेत येतंय. विखेंनी अजित पवारांना भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे.

नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे. अजित पवारही स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे.

प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी काल ( ता. 12 ) मुलाखत घेतली. या मुलाखतीत विखे व पवार कुटुंबातील संघर्षा विषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना हा संघर्ष वैयक्तिक नसल्याचे सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “माझ्या वडिलांची शिकवण होती की पद मिळविण्यासाठी काम करू नका. लोकांसाठी काम करा, या शिकवणुकीमुळेच जिल्ह्यातील सामान्य लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. खासदार होईल केंद्रीय मंत्री होईल म्हणून त्यांनी कधी काम केले नाही. त्यामुळे मी पदापेक्षा कामाला महत्त्व देतो. माझ्यावर माझे वडील, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “आमचा व्यक्तिगत संघर्ष नव्हता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांचे आमच्याशी कौटुंबिक नाते आहे. ते 1951 साली प्रवरेच्या सेवेत आले. पुढे त्यांनी प्रवरेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषविले. त्यावेळी शरद पवार प्रवरा लोणीतील महात्मा गांधी विद्यालयात दोन-तीन वर्षे शिकायला होते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर भांडण गेले नाही. काळाच्या ओघात प्रत्येकाने राजकीय भूमिका घेतल्या होत्या. माझ्या वडिलांनी, शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“शेतकरी प्रश्नावर ज्यावेळी उकल व्हायची त्यावेळी सरकार म्हणून प्रश्न सुटत नाहीत. त्यावेळी त्यांनी खंडकऱ्यांची चळवळ व शेतकऱ्यांच्या विविध चळवळीत ते होते. शेतकऱ्यांसाठी तत्कालीन राजकर्त्यांच्या विरोधात माझ्या वडिलांनी भूमिका घेतली. त्यांच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात गटबाजी अनेक वर्षांची आहे. आमचे वडील व आम्ही शंकरराव चव्हाणांबरोबर अनेक वर्षे काम केले. त्या मतभेदातून दरी वाढत गेली,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

“लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आम्हा कुणालाही मान्य नव्हती. त्यामुळे आमची ती तत्वाची लढाई होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही निर्माण झाली पाहिजे ही, माझ्या वडिलांनी राजीव गांधी यांच्या विरोधात घेतली. त्या विरोधात ही सर्व मंडळी होती. या लढाईपासून बाकीचे बाजूला झाले मात्र माझ्या वडिलांनी लढाई सोडली नाही. कारण लढाई तत्त्वाची होती. विचारांशी तडजोड करायची नाही ही त्यांची पहिल्यापासून भूमिका होती. म्हणून तीच भूमिका आमची आजही कायम आहे,” असे त्यांनी सांगितले.

“शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे व्यक्तिगत काही नाही. व्यवस्थेच्या राजकारणात विचार भिन्नता असणारच. काळाच्या ओघात या गोष्टी अपोआप दुरुस्त होतील. पक्षीय राजकारणात त्यांची व आमची भूमिका वेगळी राहणार आहेच. यात काही तडजोड असण्याचे काही कारण नाही. व्यक्तिगत पातळीवर सगळ्यांनीच बसून या विषयावर मंथन करण्याची आवश्यकता आहे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.