पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी दणक्यात साजरा कऱण्यात आला, पण खरी चर्चा रंगली ती त्यांच्या समर्थकांनी `चिंचवडचे भावी आमदार` म्हणून शहरात लावलेल्या होर्डिंगजची. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकारणाची दिशा दर्शविणारी होर्डिंग्ज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान, चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप असून आगामी काळासाठी नवनाथ जगताप यांचे नाव चर्चेत आल्याने शहराच्या राजकिय वर्तुळात मोठी खळबळ आहे. आता नवनाथ जगताप हे राष्ट्रवादीच्या पंखाखाली गेले असून दोनच आठवड्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्र भेट घेतली. पाठोपाठ आता त्यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून सुरू झाला आहे.
माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी परिसरातील हाडाचे सामाजिक कार्यकर्ते असाच परिचय आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे मोठी धमाल, अक्षरशः जत्रेसारखी गर्दी होती. उत्साही कार्यकर्त्यांची प्रचंड फौज त्या दिवशी घरचेच कार्य असल्यासारखी राबत होती. वाढदिवसाला शिवेसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, माथाडी कामागारांचे नेते इरफान सय्यद, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, भाजपाचे माजी शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, सनी ओव्हाळ, रावसाहेब चौगुले, दिपील तनपुरे यांच्यासह राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार, उद्योग, सहकार क्षेत्रातील हजारो नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर घेतले तर चक्क ३७५ वर रक्त बाटल्या जमा झाल्या. आरोग्य तपासणी शिबिरात ३५० जणांची तपासणी कऱण्यात आली. काचबिंदू, मोतीबिंदू तपासणी शिबिरात ५०० वर जेष्ठांनी सहभाग घेतला. ह्रदयरोग तपासणी शिबिरातही ४५० नागरिकांनी ह्रदयरोगाचे निदान करून घेतले. मोफत पीयुसी चाचणीचा उपक्रमही घेण्यात आला. सायंकाळी नवनाथ जगताप यांची तुला कऱण्यासाठी शालेय साहित्य दुसऱ्या तागडीत ठेवले आणि ते विद्यार्थांना वाटप करण्यात आले. अनाथाश्रमातील बालकांनाही मिष्ठांन्नभोजन देण्यात आले. अशा प्रकारे सामाजिक उपक्रमांनी नवनाथ जगताप यांचा वाढदिवस साजरा कऱण्यात आला, पण गाजला तो होर्डिंग्जमुळे.
भावी आमदार म्हणून चिंचवड विधानसभेसाठी राहुल कलाटे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, कैलास कदम यांची नावे अनुक्रमे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून चर्चेत असतात. यापैकी काटे, भोईर, भोंडवे, कदम यांनी सर्वांनीच चिंचवडची निवडणूक लढविलेली आहे आणि पुन्हा तयारी आहे. आता त्यात नवनाथ जगताप यांची भर पडल्याने रंगत वाढली आहे.
विद्यमान भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने भविष्यात त्यांचा वारसा कोण चालवणार यावर शहरात चर्चा सुरू आहे. त्यांचेच धाकटे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे तसेच भाऊंच्या धर्मपत्नी आश्विनी यांचेही नावे भाजपा वर्तुळातून घेतले जाते. गेल्या वर्षापासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बरोबरच शंकर जगताप यांचेही फोटो भाजपा नगरसेवकांच्या पोस्टर्स, बॅनर्सवर लागत असल्याने वारस शंकर जगताप असणार हे एव्हाना लक्षात आले. भाजपाची सत्ता येण्यापूर्वी आमदार जगताप यांची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी परिसरातील कामे पाहण्याची जबाबदारी ही नवनाथ जगताप यांच्याकडे होती. आमदार जगताप यांचे प्रत्येक निवडणुकित वर्चस्व असण्यामागे ते एक मोठे कारण होते. विधानसभा निवडणुकित किवळे, मामुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, रहाटणी, काळेवाडीत आमदार जगताप मागे पडले तरी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरवमध्ये सगळी कसर भरून निघत असे आणि त्याचे पडद्यामागचे खरे सूत्रधार नवनाथ जगताप होते. आता नवनाथ जगताप यांनीच उठाव केल्याने आमदार समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. आमदार जगताप यांनी हे सगळे समिकरण ओळखूनच नवनाथ जगताप यांनी राष्ट्रवादीत जाऊ नये यासाठी सहा महिन्यापासून भरपूर प्रयत्न केले. कारण त्यांना शंकर जगताप यांचे नाव पुढे चालवायचे होते आणि नवनाथ जगताप यांचा त्याला कडवा विरोध होता. अखेर वाढदिवसाचे निमित्ताने सत्य काय ते बाहेर आले आणि भावी आमदार म्हणून नवनाथ जगताप यांच्या प्रचाराचा नारळ फूटला. शहरात साई चौक, कृष्ण चौक, सांगवी फाटा, औंध, पिंपरी, चिंचवड, नाशिक फाटा, काटेपूरम चौकात सुमारे १०० होर्डींग्ज आणि २०० वर छोटे फलक भावी आमदार नवनाथ जगताप असे असल्याने राजकारण तापले आहे.