धोकादायक इमारतींची अभियंत्यांकडून तपासणी करा; महापालिकेचे आवाहन

0
387

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – महापालिका क्षेत्रामधील जुन्या इमारतींना पावसाळ्यामध्ये धोका  निर्माण होतो. अशा इमारतींमुळे त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि  त्या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना तसेच  ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे  धोका टाळण्यासाठी  प्रत्येक इमारत मालकाने आपल्या इमारतींची तपासणी तज्ञ अभियंत्यांकडून करून घेऊन त्यांच्या सुचनांनुसार महापालिकेकडून जरूर ती परवानगी घेऊन वेळेत इमारत दुरुस्त करून घ्याव्यात , अशी सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे.

जुन्या इमारतींची पाहणी करून त्यांच्या बाबतीत शक्य ती सर्व दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा देण्यात येत आहेत. तथापि आपापल्या मालकीच्या इमारती संबंधी वेळोवेळी पाहणी करून ती इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५ अन्वये प्रत्येक इमारत मालकाची आहे. ही  जबाबदारी पार पाडण्यासाठी आपापल्या इमारतींची तपासणी तज्ञ अभियंत्यांकडून करून घेऊन त्यांच्या सुचनांनुसार महापालिकेकडून जरूर ती परवानगी घेऊन दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने शहरातील एखादी इमारत किंवा तिचा काही भाग, छप्पर, जिना धोक्याचा अथवा पडण्यास आला आहे, असे आढळून आल्यास त्याबाबतची लेखी माहिती  नागरिकांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील शहर अभियंता यांच्या कार्यालयात सत्वर द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  अशा इमारतीची पाहणी करून धोका नाहिसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. तसेच शहरातील एखादी इमारत किंवा तिचा काही भाग आकस्मिकरित्या कोसळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला दूरध्वनी क्र. २७४२५५११, २७४२५५१२, २७४२५५१३ आणि  ६७३३३३३३ वर कळवावे त्याचबरोबर  जवळील अग्निशामक केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी  जन. अरुण कुमार वैद्य, मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी-१०१,२७४२३३३३. २७४२२४०५, ९९२२५०१४७५,  राजमाता जिजाऊ उप अग्निशमन केंद्र भोसरी- ८६६९६९२१०१ ९९२२५०१४७६,  उप अग्निशमन केंद्र प्राधिकरण- २७६५२०६६, ९९२२५०१४७७, उप अग्निशमन केंद्र रहाटणी- ८६६९६९३१०१  ९९२२५०१४७८,  उप अग्निशमन केंद्र तळवडे- २७६९०१०१, ९५५२३००१०१,   उप अग्निशमन केंद्र, चिखली-  २७४९४८४९, ८६६९६९४९०१ या क्रमांकावर  संपर्क साधावा असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

इमारतीचा एखादा भाग धोकादायक असल्यास तो  भाग दुरुस्त करणे शक्य असल्यास इमारतीच्या  मालकास दुरुस्तीची  नोटीस देण्यात येणार आहे. तसेच इमारत मालकाने दुरुस्ती करण्याबाबत असमर्थता दर्शविल्यास भाडेकरूसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४४६ नुसार आवश्यकतेप्रमाणे  दुरूस्तीचे नकाशे, आवश्यक ती कागदपत्रे दाखल केल्यास दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.  धोकादायक इमारतीचे  दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत धोक्याच्या इमारतीमध्ये नागरिकांनी राहू नये. किंबहुना पावसाळ्याच्या काळात नागरिकांनी धोक्याच्या इमारतीमध्ये न राहता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी.

धोक्याच्या इमारतीबाबत दुरुस्तीसाठी मालक, भाडेकरू यांच्याकडून येणाऱ्या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. याबाबतच्या अडचणी आल्यास अडचणींचे निराकरण करून घेण्यासाठी शहर अभियंता यांच्याबरोबर मार्गदर्शनासाठी समक्ष संपर्क साधावे. तसेच धोकादायक घरे, इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळवण्यासाठी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांच्याकडे अर्ज करावे. पावसाळा सुरू होत असल्याने नागरिकांच्या जीवितास होणारा धोका व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या सुचानंचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.