25 कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढले, आम्ही भ्रष्टाचार संपवला – निर्मला सितारामन

0
182

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) : गेल्या 10 वर्षात आम्ही जे काम केलंय त्याच्या भरवशावर देशाची जनता आम्हाला पुन्हा संधी मिळेल. देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले. देशातील 80 कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन दिलं. मोदींनी सर्व क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या. 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्य़ाचा आम्हचा प्रयत्न असून त्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू केलेत. देशातील 25 कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. जनतेच्या अन्नविषयक समस्या दूर केल्या आहेत. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.

देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळाव्यात
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. जनहितार्थ काम सुरू केले आहे. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिले. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्राने पुढे जातोय.

शेतकरी, महिला आणि तरुणांवर भर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. आदिवासी जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ
पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.

2014 मध्ये देशासमोर आव्हाने होती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, विकास कार्यक्रमांनी सर्वांसाठी घरे, प्रत्येक घरासाठी पाणी, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी स्वयंपाकाचा गॅस आणि सर्वांसाठी बँक खाती विक्रमी वेळेत या माध्यमातून प्रत्येक घर आणि व्यक्तीला लक्ष्य केले आहे. आमचे सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेने काम करत आहे. आपल्या तरुण देशाच्या आकांक्षा उच्च आहेत, वर्तमानात अभिमान आहे आणि उज्ज्वल भविष्याबद्दल आशा आणि विश्वास आहे.

गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व बदल झाले आहेत. 2014 मध्ये देशासमोर मोठी आव्हाने होती. सरकारने त्या आव्हानांवर मात केली आणि संरचनात्मक सुधारणा केल्या. लोकस्नेही सुधारणा केल्या.