महाराष्ट्राच्या लेकीचा अमेरिकेत अखेरचा श्वास; कुटुंबियांनी घेतला अवयव दानाचा धाडसी निर्णय

2 Min Read

दि.०८(पीसीबी)-सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज वडगाव येथील नीलम तानाजी शिंदे हिच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. अमेरिकेत झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल 1 वर्ष 27 दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या नीलमने अखेर 28 मार्च 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला.

14 फेब्रुवारी 2025 रोजी कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे रस्त्यावरून चालत असताना एका वाहनाने तिला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कवटीचे फ्रॅक्चर झाले होते, तसेच हात आणि पायालाही गंभीर इजा झाली होती. त्यानंतर तिला तातडीने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे ती अपघातानंतरपासून कोमामध्ये होती.

डॉक्टरांनी तिच्यावर शक्य ते सर्व उपचार केले, मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. अखेर 13 महिन्यांच्या प्रदीर्घ उपचारानंतर नीलमची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबली.

नीलम उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिच्या अपघाताची माहिती मिळताच भारतातील कुटुंबीयांनी अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सरकारच्या हस्तक्षेपानंतर कुटुंबीयांना तातडीने व्हिसा मिळाला होता.

दरम्यान, नीलमच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांनी अत्यंत उदात्त निर्णय घेत तिचे अवयवदान केले आहे. तिचे डोळे आणि त्वचा दान करण्यात आली असून, त्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे.

आज, 7 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेतील माउंट व्हर्नन मेमोरियल पार्क येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, आखाती देशांतील तणावामुळे नीलमचे वडील आणि कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकत नाहीत. तिची आत्या अमेरिकेत सर्व विधी पार पाडणार आहे.नीलमच्या या दुर्दैवी निधनाने संपूर्ण सातारा जिल्हा शोकमग्न झाला असून, तिच्या आठवणी कायम जिवंत राहणार आहेत.

Share This Article