घराच्या वाटणीवरून भावाला मिरची पूड टाकून मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

निगडी, दि. 1 (पीसीबी) :

वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून झालेल्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास साईनाथनगर, निगडी येथे घडली.

अरविंद मोहन खोलीया (वय 55, रा. साईनाथनगर, निगडी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वल्लभ मोहन खोलीया (वय 53, रा. साईनाथनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद आणि त्यांचा भाऊ वल्लभ यांच्यामध्ये वडिलोपार्जित घराच्या वाटणी पत्रावरून वाद सुरू आहे. त्यावरून त्यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी अरविंद आणि त्यांची पत्नी मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घराच्या गेट जवळ आल्यानंतर अरविंद यांचा लहान भाऊ वल्लभ याने अरविंद आणि त्यांच्या पत्नीला अडवले. तुम्हाला आता जिवंत सोडत नाही असे म्हणत अरविंद यांच्या डोळ्यात मिरची टाकून अरविंद आणि त्यांच्या पत्नी यांना लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article