शाळकरी मुलीने वर्गशिक्षिकेला सांगितली आपबिती; पोलिसांनी ठोकल्या आईच्या प्रियकराला बेड्या

PCB Admin
2 Min Read

रावेत, दि. ३० (पीसीबी) : शाळकरी अल्पवयीन मुलीने आपल्यावर बेतलेली आपबिती वर्गशिक्षिकेला सांगितली. शाळेच्या प्राचार्यांनी पोलिसांना बोलावून तात्काळ माहिती दिली. 14 वर्षीय मुलीसोबत तिच्या आईच्या प्रियकराने अश्लील चाळे केल्याने पोलिसांनी देखील प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला अटक केली.

पंकज बाबुराव धोत्रे (वय 45, रा. हांडेवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय पिडीत मुलीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रावेत ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई आणि वडील गेल्या सहा वर्षांपासून विभक्त राहतात. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ आईसोबत रावेत येथील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. पीडित मुलगी देहूरोड येथील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. आरोपी पंकज हा एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. तो विवाहित असून त्यालाही मुले आहेत. तर, पीडित मुलीची आई एका बँकेत नोकरी करते. पीडित मुलीची आई आणि पंकज यांच्यात 2019 पासून प्रेमसंबंध आहेत. पंकज आठवड्यातून चार ते पाच वेळा पीडित मुलीच्या घरी येतो. आई घरी नसताना आरोपी पंकजने वर्षभरापूर्वी मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

पीडित मुलगी घरी एकटीच असताना आठ ऑगस्ट रोजी पंकजने मुलीशी पुन्हा अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला सोडले. 28 ऑगस्ट रोजी मुलीने शाळेत गेल्यानंतर आपल्यावर बेतलेला प्रसंग

वर्गशिक्षिकेला सांगितला. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षिकेने त्वरित प्राचार्यांना याबाबत माहिती दिली. प्राचार्यांनी पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलिसांना बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपी पंकज याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.

Share This Article