मनसेने भाजपला पाठिंबा देताच, किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा

2 Min Read

मुंबई, दि. १० (पीसीबी)- भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. अलविदा मनसे म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी मनसेला रामराम केला आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली, असं किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

अलविदा मनसे!
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.

पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप-मोदी-शाह यांच्या विरोधात जे तथ्य-विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.

आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?

Share This Article