विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार उघड, पाच जणांना अटक

bpcauthor bpcauthor
3 Min Read

हजारो लिटरच्या टॅंकर मधून काढले जायचे अवघे 80 लिटर इंधन

चिंचवड, दि. ०८ (पीसीबी) – मुंबई येथून पुणे विमानतळावर विमानाचे इंधन वाहतूक करणाऱ्या टॅंकर मधून इंधन चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. सोमाटणे टोल नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात हा काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 6) करण्यात आली आहे.

मंगेश सखाराम दाभाडे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय 45, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय 28, रा. उत्तर प्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय 31, रा. पिंपळखुटे, ता. मावळ), परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे टोल नाक्याजवळ शांताई हॉटेलच्या परिसरात विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टॅंकर मधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टॅंकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल आणि परशुराम याच्या मदतीने टॅंकर मधून जेट इंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.

आरोपींकडून 1540 लिटर एटीएफ/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण एक लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर सन 2008, सन 2016 आणि सन 2019 मध्ये दारूबंदी कायद्यान्वये चार तसेच सन 2022 मध्ये मारहाण केल्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.

अशी व्हायची इंधनाची चोरी

जेट इंधन भरलेले टॅंकर नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून पुणे विमानतळावर येत असतात. टॅंकर मध्ये इंधन भरताना इंधनाच्या पृष्ठभागावर फेस येतो. त्याच वेळी टॅंकर मधील इंधनाची मोजणी केली जाते. टॅंकर जेंव्हा पुणे विमानतळावर येतो तेंव्हा फेस कमी झालेला असतो त्यामुळे त्याची पातळी कमी दाखवली जाते. या तांत्रिक अडचणीचा फायदा आरोपींनी घेतला. हजारो लिटर इंधन भरलेल्या टॅंकर मधून अवघे 70 ते 80 लिटर इंधन काढून घेतल्यास कोणालाही संशय येत नसे. हे इंधन आरोपी काळ्या बाजारात चढ्या दराने विकत असत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक धनराज किरनाळे, सहायक फौजदार नारायण जाधव, संजय गवारे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, वासुदेव मुंडे, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.

Share This Article