शिवसेनेला पुन्हा धक्का, बबन घोलप यांची कन्या भाजपमध्ये

1 Min Read

नाशिक, दि. १४ (पीसीबी) : माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलाय. हा धक्का ताजा असतांनाच उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले माजी मंत्री बबन घोलप यांच्या कन्या यांनीही आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचे ठरविले आहे. माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप ह्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर तनुजा घोलप या कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः मी माझ्या कामानिमित्त त्यांची भेट घेतली प्रवेश करण्याचे कारण नाही म्हणून स्पष्ट केले होते.

त्यामुळे तनुजा घोलप या आपल्या वडिलांसहित उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन कोणत्या पक्षात जाणार याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. तनुजा घोलप या राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पक्ष प्रवेश करणार आहेत.

Share This Article