फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे नवा वाद, भाजपमधेही खळबळ

PCB Admin
2 Min Read

पुणे, दि. ९ (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने आदर्श संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. राज्यपालांच्या विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चा देखील आयोजित केला आहे. त्यातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे.

पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी संबोधताना म्हटलं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

Share This Article