पिंपरी चिंचवडच्या सर्व प्रभागांमध्ये अतिक्रमण विभागाची धडक कारवाई, ४५ पत्राशेडही केले निष्कासीत

0
220

पिंपरी,दि.३० (पीसीबी) :- शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच महत्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई सलग दुस-या दिवशीही सुरु असून यामध्ये टपरी, हातगाडी, फ्लेक्स, पत्राशेड आदींवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व प्रभागामध्ये अतिक्रमण धडक कारवाई सुरु आहे. या कारवाईला दि. २७ एप्रिल रोजी सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी गुरुद्वारा चौक ते धरमराज चौक, चिखली, बो-हाडेवाडी, शिवरोड, उद्यमनगर, भोसरी एमआयडीसी, कल्पतरु सोसायटी ते जगताप डेअरी, सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा, सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते छावा चौक, भोसरी – आळंदी रोड, पीएमटी चौक, गव्हाणे वस्ती, रत्ना हॉस्पीटल परिसर यमुनानगर, डिलक्स चौक पिंपरी या भागात धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये ३९ हातगाड्या, १ टेम्पो, ८ टप-या, ४० झोपडीवजा शेड, २ शेड, २ पत्रा शेड, ६२० किऑक्स, १५ बॅनर, २५ बोर्ड, ४७ फ्लेक्स हटविण्यात आले.

दुस-या दिवशीदेखील विविध भागात अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरु आहे. शहरामधील प्रमुख रस्ते, फुटपाथ यावर बेशिस्त वाहने पार्क केल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या. अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स आदींबाबत आणि टप-या तसेच पदपथावरील झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पर्यायाने अपघात होण्याची शक्यता असते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या नागरिकरणासोबत विविध समस्यादेखील निर्माण होत आहेत.