हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली खंडणी

0
412

भोसरी, दि. २० (पीसीबी) – हॉटेल व्यवसायात भागीदार असलेल्या एका तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडे खंडणी मागितली. तसेच व्यावसायिकाला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७) दुपारी भोसरी येथे घडली.

आदित्य दीपक चव्हाण (वय २५, रा. भोसरी), ओंकार विधाते, निखील थेऊरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जेरी जोसेफ अँड्रस (वय २०, रा. अहमदनगर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोसरी येथील एका हॉटेल मध्ये काम करत असताना त्यांची आदित्य याच्या सोबत ओळख झाली. त्या दोघांनी पुढे भागीदारीत ए मॅजिकल मुव्हमेंट कॅफे नावाचे हॉटेल सुरू केले. हॉटेल सुर होऊन चार महिने झाले तरी आदित्य याने फिर्यादी यांना हॉटेलचा कोणताही हिशोब दिला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आदित्यला विचारणा केली. फिर्यादी हे हॉटेल मध्ये असताना आरोपींनी त्यांना दुचाकीवरून लांडेवाडी झोपडपट्टी येथे नेले. तिथे नेऊन आदित्य याने हॉटेल सुरू करण्यासाठी घेतलेल्या पैशांची फिर्यादी कडे मागणी केली. फिर्यादी मारहाण करून आरोपींनी फिर्यादीच्या आईला फोन केला. २० हजार रुपये दिले तरच फिर्यादी यांना सोडू. पैसे दिले नाहीत तर फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.