पुणे , दि. २ (पीसीबी) – राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा टीडीएम (TDM) हा मराठी सिनेमा २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. परंतु सिनेमाला सिनेमाला थिएटर मिळत नसून भाऊरावांसह टीडीएमच्या टीमने खंत व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना भाऊरावांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले. मात्र आता स्वत: राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाऊरावांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी लवकरात लवकर टीडीएमला स्लॉट उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.
१ मे रोजी भाऊराव आणि त्यांच्या टीमने फेसबुक लाइव्ह करत टीडीएम या मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याची व्यथा मांडली. फेसबुक लाइव्हवर बोलताना भाऊराव म्हणाले की, ‘हा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे, तुम्हाला जर आवडला तर लोकांपर्यंत पोहोचवा. माझी खंत एवढीच आहे की, एवढा चांगला सिनेमा झाला आहे आणि जिथे शो लागले आहेत तिने नव्याने शो लावले जातायंत. लोकांनी शोबद्दल विचारल्यास त्यांना सांगितलं जात आहे की आज टीडीएमचा शो नाही. एखादाच शो आहे, असं सांगितलं जात. यावरुन असं वाटतं की कुठेतरी मराठी सिनेमा संपतोय आणि संपवला जातोय.’
भाऊरावांच्या या फेसबुक लाइव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे.
‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी,’ असा आदेश अजित पवारांनी दिला आहे.