हवेली, खेड, मावळ, शिरूर तालुक्यात वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

0
356

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – हवेली, खेड, मावळ आणि शिरूर तालुक्यात वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत वाहन चोरांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १३ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

प्रतीक दत्तात्रय भालेराव (वय ३१, रा. कडाचीवाडी, चाकण. मूळ रा. कंदळी वडगाव, ता. जुन्नर), संदीप रामचंद्र ढोंगे (वय २७, रा. कडाचीवाडी, चाकण. मूळ रा. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीजवळ वाहन चोरी करणारे दोघेजण आले असल्याची माहिती पोलीस अंमलदार आशिष बोटके यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध भागात वाहन चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.

चार तालुक्यातून चोरली १३ वाहने
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील वाहन प्रतीक आणि संदीप यांच्याकडे सापडले. त्यानुसार त्यांना अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेण्यात आली. पोलीस कोठडीत असताना दोघांनी हवेली, मावळ, खेड आणि शिरूर तालुक्याच्या सहा पोलीस ठाण्यांच्या परिसरातून १३ वाहने चोरी केल्याचे सांगितले.

लाखोंचा मुद्देमाल जप्त
या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील तीन, पिंपरी दोन, महाळुंगे एमआयडीसी, सांगवी, तळेगाव दाभाडे आणि रांजणगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून पाच लाख पाच हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या पथकाने केली कामगिरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनील कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, आशिष बोटके, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.