‘हलाल मुक्त दिवाळी’ या राष्ट्रव्यापी अभियानाची पुण्यातून सुरुवात !

0
305

– केएफसी, बर्गर किंग, पिझ्झा हट या हलाल प्रमाणित आस्थापनांवर बहिष्काराच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक !

पुणे, दि. १८ (पीसीबी) – गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्‍लिम देशांच्‍या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्‍पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत. मुळात भारत सरकारच्‍या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्‍या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्‍ड्‌स, केएफ्‌सी, बर्गरकिंग, पिझ्‍झा हट यांसारख्‍या नामवंत कंपन्यांच्या आऊटलेटमध्‍ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्‍ध नसल्‍याने ते हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्‍लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ सक्‍तीने विकत आहेत. भारतातील १५ टक्‍के मुसलमान समाजासाठी ८० टक्‍के हिंदु समाजावर हलाल उत्‍पादनांची सक्‍ती आम्‍ही खपवून घेणार नाही. भारताला धर्मनिरपेक्ष म्‍हणायचे आणि धर्माच्‍या आधारावर उत्‍पादनांच्‍या इस्‍लामी प्रमाणिकरणाचा घाट घालायचा, हा काय प्रकार आहे ? असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्‍थित केला. हलाल सक्‍तीच्‍या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल मुक्‍त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्‍यात येत आहे. या अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्‍मारकाजवळ आंदोलन करण्‍यात आले.

‘हलाल’ पदार्थ देणे, हा हिंदूंच्‍या धार्मिक स्‍वातंत्र्याचा अनादर ! – श्री. सुनील घनवट, राज्य संघटक –
‘मॅकडोनाल्ड्स’, ‘के.एफ्.सी’ यांसारख्‍या बहुराष्‍ट्रीय आस्‍थापनांनी भारतातील त्‍यांची फूड आऊटलेट १०० टक्‍के ‘हलाल प्रमाणित’ आहेत, असे घोषित केले आहे. ‘मॅकडोनाल्‍ड्‍स’मध्‍ये जाणार्‍या बहुसंख्‍य हिंदूंना इस्‍लामी मान्‍यतेनुसार बनवण्‍यात आलेले ‘हलाल’ पदार्थ देणे, हा हिंदूंच्‍या धार्मिक स्‍वातंत्र्याचा अनादर आहे असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. भारतातील हिंदूंना खाण्‍याचे किंवा खरेदीचे संवैधानिक स्‍वातंत्र्य का नाही ? कोणत्‍याही परिस्‍थितीत आम्‍ही हिंदु समाजावर हलाल उत्‍पादनांची सक्‍ती खपवून घेणार नाही. याचसमवेत हल्‍दीराम, हिमालया, नेस्‍ले यांसारख्‍या अनेक कंपन्‍या त्‍यांचे शाकाहारी पदार्थ देखील ‘हलाल सर्टिफाइड’ करून विकत आहेत. त्‍यामुळे हिंदु समाजाने ‘हलाल प्रमाणित’ उत्‍पादने न घेता यंदाची मंगलमय दिवाळी ही ‘हलाल उत्पादने मुक्‍त’ साजरी करावी, असे आवाहन त्यांनी समितीच्‍या वतीने केले.

हलाल प्रमाणपत्राला संघटित होऊन विरोध करायला हवा ! – अधिवक्त्या सीमा साळुंखे
हलाल प्रमाणपत्र व्यवस्था उखडून टाकण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन त्याला कडाडून विरोध करायला हवा. हलाल या समांतर अर्थव्यवस्थेला चटके देण्याची वेळ आली आहे. ही व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

हलाल प्रमाणित उत्पादन विक्री करणाऱ्यांवर बहिष्कार टाका ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर
दहशतवादाला खतपाणी घालण्याकरिता हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून पैसा गोळा केला जात आहे. समांतर अर्थव्यवस्था चालवून देशाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हलालच्या माध्यमातून हिंदूंचे शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही व्यवस्था मोडून टाकण्यासाठी हलाल प्रमाणित उत्पादन विक्री करणाऱ्यांवर बहिष्कार टाका असे आवाहन अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी केले.

या वेळी सनातन संस्‍थेचे चैतन्‍य तागडे, हिंदू जनजागृती समीतीचे पराग गोखले, अधिवक्ता नीलेश निढाळकर, अधिवक्त्या सीमा साळुंखे आणि अन्य समविचारी संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांसह ७५ हून अधिक राष्‍ट्र अन् धर्मप्रेमी नागरिक उपस्‍थित होते.