स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेची कसरत; विविध उपक्रम राबविण्यावर पालिकेचा भर

0
403

पिंपरी,दि.३१(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभागी असून स्वच्छ सर्वेक्षणाकरिता आवश्‍यक असलेल्या बाबींची महापालिकेमार्फत पूर्तता करण्यात येत आहे. शहरातील कचरा कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेमार्फत विविध नवनविन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कच-याचे प्रमाण कमी होण्यासाठी महापालिकेतील विभागांमध्ये होणा-या कार्यक्रमप्रसंगी शुन्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यपध्दतीचा अवलंब करणेकामी मानक कार्यप्रणालीवर प्रामुख्याने भर देण्याचे निर्देश आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सूचित केलेनुसार महापालिकेतील कार्यक्रमांमध्ये (मोहिम, स्पर्धा, चर्चासत्र व्याख्याने परिसंवाद संमेलन, उदघाटने भूमीपुजन, सत्कार समारंभ आदी) मानक पध्दतींचा अवलंब करणेबाबत आयुक्तांनी परिपत्रकान्वये सर्व विभागांना आदेशित केले आहे.

त्याचप्रमाणे सन 2022-2023 म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत नागरिक, संघटना, संस्था, मंडळे, कंपनी आदींनी महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान येथे शुन्य कचरा मानक कार्यप्रणालीनुसार शुन्य कचरा कार्यक्रम मोहिम, स्पर्धा, चर्चासत्र व्याख्याने परिसंवाद संमेलन, उदघाटने, भूमीपुजन, सत्कार समारंभ, स्नेहसंमेलन राबविल्यास क्षेत्रीय कार्यालयांनी बुकिंग करताना भाडयामध्ये 10 टक्के सवलत देणेबाबत आदेशीत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी क्षेत्रीय कार्यालयांमधील महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान येथे शुन्य कचरा कार्यक्रम राबवुन क्षेत्रीय कार्यालयांमधून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

स्वच्छतागृहाची नियमावली!
महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृहाची स्वतंत्र व्यवस्था व फलक असावेत. पाणी, लाईटची व्यवस्था असुन कडी, कोयंडे, नळ सुस्थितीत असावेत. वायुविजनाची व्यवस्था असावी. स्वच्छतागृह स्वच्छ असावेत. वॉश बेसिनच्या ठिकाणी पाणी बचत, हात धुणे चिन्ह, फलक लावण्यात यावे. महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड गुंडाळण्यासाठी वेस्टपेपर, सॅनिटरी पॅड्‌सची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी वेस्ट लेबलचे लाल रंगाचे डस्टबीन ठेवावेत. प्रत्येक स्वच्छतागृहांमध्ये स्पर्श न होईल अशा प्रकारे सेन्सर साबण डिस्पेंसर आणि सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन असावेत.