स्वच्छतेच्या नवकल्पना मांडा, बक्षीस मिळवा; आयुक्तांचे आवाहन

0
262

पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक व स्मार्ट पद्धतीने शहर स्वच्छतेसाठी व शाश्वत स्वच्छतेची संकल्पना प्रभावीपणे रविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान (स्वच्छ इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज) स्पर्धेत विद्यार्थी, नागरिक, नवउद्योजक, कंपनी, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहराला “शाश्वत स्वच्छ शहर” म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर शहर म्हणून बहुमान मिळविण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 स्पर्धेत सहभाग नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छता करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच या मोहिमेमध्ये लोकसहभाग वाढविणे यासाठी शहरात स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धा ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधील नागरीकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक हित, कचरा मुक्तता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पारदर्शकता हे चार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेचे विषय असणार आहेत. या स्पर्धेच्या विजेत्यांना महापालिकेच्या वतीने रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 41 हजार, 31 हजार, 21 हजार असे रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी ननाविन्यपूर्ण तंत्रज्ञान महापालिकेने ठरवून दिलेल्या तपशीलामध्ये सादर करणे आवश्यक आहे. यासाठी स्पर्धकांना फोटो, व्हिडीओचा वापर करता येणार आहे. सामाजिक हित किंवा सामाजिक समावेश या गटात 1)कमी उत्पन असलेल्या वसाहती किंवा झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सुधारित कचरा संकलन आणि व्यवस्थापनासाठी सामाजिक नवसंकल्पना, 2) सेप्टिक टाक्या आणि सीवर लाइन साफ करण्यासाठी कमी किमतीची कार्यक्षम यांत्रिक उपाययोजना (मॅनहोल ते मशीन होल) 3) आरोग्यदायी आणि शाश्वत पद्धतीने सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांचे कार्यक्षम देखभाल 4) वापरलेले पाणी, मैला आणि सेप्टेजचे योग्य प्रकारे निर्वासन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट पर्यायांचा समावेश आहे.

कचरा मुक्तता या गटात 1) घरोघरी वर्गीकरण केलेल्या घनकचरा ट्रॅकिंग करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय, 2) विलगीकरण केलेल्या घनकचऱ्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, 3) लेगसी डंपसाईटच्या दुरुस्तीसाठी कमी किमतीचे पोर्टेबल उपाय या पर्यायांचा समावेश आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या गटात 1) प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया व पुनर्वापर, 2) पुनर्वापर करताना प्लास्टिकचा होणारा ऱ्हास कमी करणे, 3) पर्यावरण संवेदनशील प्रदेशात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, 4) बहुस्तरीय प्लास्टिकचे संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती, 5) लेगसी डंपसाईटसमधून प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तंत्रज्ञान, 6) प्लास्टिकसाठी पर्यावरण पूरक पर्याय या विषयांचा समावेश आहे.

पारदर्शकता या गटात 1) सेप्टिक टाक्या आणि सीवर लाइनचा ओव्हरफ्लो तपासण्यासाठी डिजिटल उपाय, 2) जनजागृती व क्षमता बांधणीसाठी नागरिक सहभाग, 3) loT आधारित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा ऑपरेशन्सचे रियल टाईम मॉनिटरिंग या विषयांचा समावेश आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानासाठी निकष तारावण्यात आले असून यामध्ये उपायांचे नाव, उपायांची मुख्य वैशिष्ट्ये, वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची मुख्य वैशिष्ठ्ये, ऑपरेशन मॉडेल, व्यावसायिक मॉडेल, प्रतिकृती, मापण क्षमता, अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ आणि स्वदेशी तंत्रज्ञान या निकषांचा समावेश आहे.

उपयांची मुख्य वैशिष्ट्ये हे 3 आर (रिड्यूस, रियुज, रिसायकल) तत्वांवर आधारित असावे, स्वच्छतेची प्रक्रिया अधिक सक्षम करणे तसेच इतर वैशिष्ट्यांचा समावेश असावा. वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मुख्य वैशिष्ठयांमध्ये वेगळेपणा, कमी खर्च, कमी देखभाल, वेळ आणि मेहनतीची बचत, वापरण्यास अनुकूल या निकषांचा समावेश आहे.

ऑपरेशनल मॉडेलमध्ये प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यासाठी मॉडेल आहे का? या निकषाचा समावेश आहे.

व्यावसायिक मॉडेलमध्ये व्यावसायिकरित्या कोठे अंमलबजवणी झाली आहे का? आर्थिक लाभ आहे का? आर्थिक लाभ होण्याची क्षमता आहे का? या निकषांचा समावेश आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये सहजतेने नक्कल करण्यायोग्ये आणि भिन्न भौगोलिक अनुकुलतेसाठी उपयुक्त असा उपाय आहे का? निर्माण करण्यात आलेले सोल्युशनची पोहच जनतेपर्यंत पोहचवणे शक्य आहे का? अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ, स्थानिक बाजारपेठेत सहज उपलब्ध असलेली उपकरणे वापरून तंत्रज्ञान विकसित करणे शक्य आहे का? या निकषांच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे.

स्पर्धकांना स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेच्या काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. स्पर्धक पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी आसाव, स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असणार आहे, पिंपरी चिंचवड शहरासाठी उपक्रम डिझाईन केलेला असावा, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल, उपक्रमाचा विषय, नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सविस्तर तपशील व स्पर्धेच्या निकषांसह देण्यात यावे. आवश्यकता असल्यास समितीच्या निर्णयानुसार सादरीकरण करावे. तसेच निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम असेल.

स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका [email protected] या इमेल वर 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाठवावेत. या स्पर्धेच्या अटी व शर्ती ठरविणे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार महापालिका आयुक्त यांच्याकडे राखीव असणार आहे. नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी लागणा-या तंत्रज्ञान निर्मितीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.