स्मार्ट सिटीच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांचा शहरातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल : मिशन डायरेक्टर राहुल कपूर यांचे मत

0
409

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत सूरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेवून केले कौतुक

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पिंपरी चिंचवड शहरात सूरू असलेले विकास प्रकल्प शहरीकरणाच्या दृष्टीने लक्ष वेधणारे ठरत आहेत. या नाविण्यपूर्ण प्रकल्पांचा शहरातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असे मत स्मार्ट सिटी मिशनचे संचालक राहुल कपूर यांनी व्यक्त केले. तसेच, जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या. पुणे व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी श्री. राहुल कपूर आणि प्रकल्प सल्लागार संपत कुमार हे दोन दिवसीय दौ-यावर होते. यावेळी, आयुक्त्‍ तथा प्रशासक राजेश पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या एबीडी व पॅन सीटी प्रकल्पांची श्री. राहुल कपूर यांनी प्रोजेक्टरद्वारे माहिती घेतली. यावेळी प्रकल्प सल्लागारांनी सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, मुन्सीपल ई– क्लास रुम, स्कुल हेल्थ मॉनिटरिंग, पब्लीक ई- टॉयलेट, सिटी मोबाईल ऍ़प अँड सोशल मिडीया, ई-क्लास रुम, पर्यावरण सेन्सर, स्मार्ट ट्राफिक, सिटी सर्व्हेलन्स, स्मार्ट पार्कींग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क, इंटीग्रेटेड कमांड कट्रोल सेंटर, ऑप्टीकल फायबर केबल, स्मार्ट वाटर सप्लाय, पब्लीक वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट सेव्हरेज, आयसीटी इनॅबल एसडब्लुएम, स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टयु पार्क अँड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी, जीआयएस इनॅबल इआरपी इन्क्लुडींग मुनिसीपल सर्व्हीस लेव्हल बेंच मेकींग, युनीक स्मार्ट ऍ़ड्रेसिंग अँड ऑनलाईन इस्टॅब्लीशमेंट लायसींग्स या प्रकल्पांचे सादरीकरण केले. तसेच, आर्थिक व भौतिक प्रगतीबाबत चर्चा करून विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत त्यांनी कौतुकही केले.

पिंपरी चिंचवड शहरात उभारलेल्या तसेच इतर शहरांसाठी मॉडेल ठरणा-या पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यान व पार्किंग व्यवस्था, रस्ते, फुटपाथ, आझादी का अमृत महोत्सव निमीत्त ज्येष्ठ नागरिकांसाठीची ओपन जिम, बैठक व्यवस्था, सुदर्शन चौक येथे सलग ७५ तासांत उभारण्यात आलेले “८ टू ८० पार्क” तसेच शहरामध्ये अर्बन स्ट्रीट अंतर्गत तयार करण्यात आलेले रस्ते व सायकल ट्रक अशा देशपातळीवर नावलौकीक व पुरस्कार प्राप्त प्रकल्पांविषयी विचार मांडून स्मार्ट सिटी योजना यशस्वी झाल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. विकास कामांचा वेग लक्षात घेवून स्मार्ट सिटीचे प्रकल्प कसे उपयुक्त् आहेत, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.