भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या अशोक भालकरची उचलबांगडी

0
518

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांची गुरुवारी अखेर उचलबांगडी करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंतापदी त्यांची बदली झाली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. विविध प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप भालकर यांच्यावर करण्यात आले होते. महापालिका सर्वसाधारण सभेत भालकर यांच्या तत्काळ बदलीची मागणी जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्यासह अन्य सदस्यांनी लावून धरली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अशोक भालेकर हे जुलै 2019 रोजी रुजू झाले होते. त्यांच्या कार्यशैलीबाबत विविध गंभीर तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची जबाबदारी सोपविण्यात आली. स्मार्ट सिटीत ही त्यांनी अनेक चुकीची कामे केल्याचे आरोप झाले. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नगरसेवकांनी अनेकवेळा महापालिका सभागृहात आवाज उठविला. त्यांच्या कामकामाजवर सडकून टीका केली होती. भालकर यांना रुजू करून घेण्यास महापालिकेतील स्थापत्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवली होती. त्यांना राज्य सेवेत परत पाठविण्याची मागणी केली जात होती.

अखेरीस आज भालकर यांच्या बदलीचा आदेश आज महापालिकेत धडकला. राज्य शासनाने त्यांना पदोन्नती देत
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंतापदी बदली केली आहे.