स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

0
449
  • दोन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका

पिंपळे सौदागर, दि. 8 (पीसीबी):- पिंपळे सौदागर येथील स्पॉट 18 मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला. मसाजच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. यातून दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) सायंकाळी करण्यात आली.

स्पा मॅनेजर महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह स्पा मालक रणजीत सिंह उर्फ नील राजपूत (वय 30) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, साई चौक पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पॉट 18 मॉल मध्ये द गोल्ड थाई स्पा आहे. तिथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाला मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला. त्यावेळी स्पा मॅनेजर दलाल महिला आणि स्पा मालक यांनी दोन तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे उघडकीस आले.

स्पा मॅनेजर महिलेला पोलिसांनी अटक केली. तर दोन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी तीन हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.