पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात मोठी बातमी हाती आली आहे. बँकेच्या फसवणूक प्रकरणातील अटक आरोपींची आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य आणि संस्था, गाडी, घर अशा ४७ प्रॉपर्टीज एकूण १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली आहे. याबाबत ईडीने ट्वीट करत माहिती दिली आहे. सुमारे ४२९ कोटी रुपयांच्या घोट्ळात सेवा विकास बँक बुडाली असून सर्व व्यवहार रिझर्व बँकेने बंद केले आहेत.
सेवा विकास सहकारी बँकेच्या ४२९ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने माजी उपमहापौर अमर मुलचंदानी तसेच पुणे शहरातील शैक्षणिक संस्था चालक विवेक अरन्हा आणि सागर सुर्यवंशी आणि इतर काही जणांना अटक केली होती. यात जानेवारी महिन्यात ईडीने सेवा विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना पिंपरी चिंचवडमधून अटक करण्यात आली होती.
कोणत्याही ठोस आर्थिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता सहकारी बँकेचे व्यवस्थापन कौटुंबिक व्यवसायाप्रमाणे केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कोणत्याही योग्य त्या सुरक्षिततेशिवाय आणि अर्जदारांच्या पतपात्रतेचा विचार न करता कर्ज मंजूर केले जात होते. अशी जवळपास ९२ टक्के खाती असल्याचे समोर आले होते. त्यामुळे बँक आता दिवाळखोरीत गेली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली आहे.