मुंबई, दि. १४ (पीसीबी)-महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत, महिलांचा वापर करून, नवनवीन मार्गांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आहे. यामध्ये परदेशी महिलांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड आणि गुदाशयामध्ये दडवून भारतात आणलेले साडेपाच कोटींचे कोकेन जप्त केले आहे.
डीआरआयने आखलेल्या कारवायांद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. आतापर्यंत या टोळ्या सामानामध्ये अमली पदार्थ लपवण्यासाठी विविध कल्पक पद्धतींचा अवलंब करत होत्या.
मात्र आता नवीन प्रकारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत, डीआरआय मुंबई शाखेने तीन प्रवाशांकडून एकूण 568 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 5.68 कोटी रुपये इतकी आहे.
सॅनिटरी पॅडमध्ये लपवून कोकेनची तास्कारी करणाऱ्या दोन महिला युगांडा इथल्या होत्या. तिसरी प्रवासी महिला टांझानिया येथील होती आणि तिने कोकेन असलेली कॅप्सूल गुदाशयामध्ये लपवून ठेवली होती. एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदी अंतर्गत, हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून तीनही महिला प्रवाशांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.