दि १८एप्रिल (पीसीबी ) – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज सकाळी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन आरती केली. त्यावेळी आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
गणपती बाप्पाकडे काय मागितले त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, राज्यात लोकसभा निवडणुका होत असून त्या चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात, राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यातून शक्तिप्रदर्शनाचे प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुतीच्या उमेदवाराचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहत आहे. अर्ज दाखल केला जाणार आहे, त्यामुळे शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे एवढेच आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
गणपती बाप्पाकडे काय मागितले या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मागील काही महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी नागरिकांची भेट घेत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करीत आहे. माझ्याशी संवाद साधत आहे आणि आज बारामती लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करीत आहे, त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली. जनसामन्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे आणि मोठा विजय मिळू दे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली.