सायबर गुन्हेगारांना उरला नाही पोलिसांचा धाक

0
319

– पोलीस आयुक्तांच्या नावाने वरिष्ठ अधिका-यांना मेसेज

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पोलीस आयुक्तांच्या नावाने शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांना मेसेज केले. तसेच सायबर सेलमधील एका पोलीस कर्मचा-याला गिफ्ट कार्ड देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर सेलमधील पोलीस अंमलदार कृष्णा गवळी यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7358921046 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो ठेवला. तसेच त्यावर आयुक्तांचे नाव देखील ठेवले. तो क्रमांक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा असल्याचे भासवून आरोपीने शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांना मेसेज केला. त्यानंतर फिर्यादी पोलीस अंमलदार कृष्णा गवळी यांना गिफ्ट कार्ड देण्याच्या बहाण्याने त्यांना मेसेज केला. याद्वारे थेट पोलिसांनाच गंडा घालण्याचा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी हा डाव ओळखून थेट गुन्हा दाखल केला आहे. आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश येत असून आरोपीच्या मागावर गुन्हे शाखेचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.