साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवासी संतापले -जितेंद्र आव्हाड

0
310

मुंबई दि. २४ (पीसीबी) गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलचा मुद्दा मुंबईच्या उपनगरांमध्ये पेटू लागला आहे. साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागत आहे. ठाणे आणि बदलापूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साध्या लोकल रद्द केल्यामुळे गर्दी वाढल्याचा दावा देखील प्रवाशांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एसी लोकलला मुंबईतील इतर भागांतही विरोध होऊ लागला असून त्यासंदर्भात भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर इशारा दिला आहे. विधानभवनात एबीपीशी बोलताना आव्हाडांनी एसी लोकलच्या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाला लक्ष्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आक्रमक होत आंदोलन केलं. साध्या लोकल रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे हे प्रवासी आक्रमक झाले होते. या प्रवाशांनी कळवा कारशेडमधून सुटणारी एसी लोकल अडवून ठेवली. आधी यावेळी सुटणारी ही लोकल साधी होती. यातून हे प्रवासी प्रवास करत होते. आता तीच एसी लोकल झाल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी जवळपास तासभर ही लोकल थांबवून ठेवली होती. मंगळवारी देखील बदलापूर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आलं.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं आहे. “मध्य रेल्वेला सर्वसामान्य प्रवाशांबद्दल ना प्रेम राहिलंय, ना आपुलकी राहिलीये. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून येणारं उत्पन्न हे देशभरात सर्वाधिक आहे. त्याच्यावर देशात अनेक रेल्वे पोसल्या जातात. आता त्यांनाच तुम्ही अडचणीत आणत आहात. तुम्ही साध्या लोकल रद्द केल्या आणि त्याजागी तुम्ही एसी टाकत आहात”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

“१० एसी ट्रेनमधून ५७०० प्रवासी जातात आणि एका साध्या लोकलमधून २७०० प्रवासी जातात. मग उरलेले प्रवासी कुठल्या ट्रेनमध्ये चढणार? त्याला काहीही पर्याय शोधलेला नाही. लोक लटकून मरत आहेत. लोकांना चढता येत नाहीये. लोकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे आंदोलन पहिल्यांना कळव्यात झालं. पण आता मुंबईभर पसरू लागलं आहे. कारण जसजशा एसी लोकल वाढत आहेत, तसतसा लोकांना संताप वाढत चालला आहे. कारण लोकांना परवडतच नाहीये”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

“आपण सर्वसामान्यांचा विचार करायचा की नाही हा मूळ प्रश्न आहे. रेल्वेला याचा विचार करावा लागेल. कोणतंही आंदोलन जेव्हा विनानेतृत्व सुरू होतं, तेव्हा ते आंदोलन भयानक असतं. कारण तो लोकांच्या मनातला राग असतो. एखाद्या राजकीय पक्षाचं आंदोलन राजकीय हेतू मनात ठेवून होऊ शकतं. पण कोणत्याही राजकीय नेत्याशिवाय, हेतूशिवाय लोक अचानक रेल्वे रुळावर आले, तर रेल्वेनं हा मनातला राग ओळखावा. उगीच बडेजावपणा करू नये”, असा सल्ला आव्हाडांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

“मी पूर्वीपासून यासंदर्भात मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी बोलत आहे. ही परिस्थिती सुधरवली नाही, तर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल. मी तर मैदानात आता उतरलो आहे. सर्वसामान्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद अनपेक्षित आहे. आंदोलनासाठी मध्यमवर्गीय रस्त्यावर येत नाहीत. पण जेव्हा ते रस्त्यावर येताना दिसतात, तेव्हा अस्वस्थता किती मोठ्या प्रमाणावर आहे, हे रेल्वेनं विचारात घेतलं पाहिजे. दोन महिन्यात १७० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. लोकांचा जीव इतका स्वस्त झालाय का? हे अमानवी कृत्य आहे. हे आंदोलन मला पेटवायची गरज नाहीये. लोकांच्या मनातच आग लागली आहे”, असंही आव्हाडांनी यावेळी नमूद केलं.