सांगण्यासारखे एकही काम नसल्यामुळे विरोधकांकडून टीका – खासदार बारणे

0
121
  • करंजाडेचा पाणी प्रश्न सप्टेंबर पू्र्वी सुटणार – आमदार बालदी
  • मोदींच्या ‘त्सुनामी’ पुढे विरोधकांची धूळधाण – प्रशांत ठाकूर

उरण, दि. 28 एप्रिल – आशावाद ते विश्वास आणि आता विश्वास ते गॅरंटी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दहा वर्षातील कारकीर्द आहे. त्यामुळे यावेळी देशात मोदींची लाट नाही तर त्सुनामी आहे. त्यापुढे विरोधकांची पुरती धूळधाण उडाली आहे, अशी टिप्पणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल (शनिवारी) रात्री केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील करंजाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार बारणे, उरणचे आमदार महेश बालदी, दिवंगत जेष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, भाजपाच उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, करंजळेचे सरपंच मंगेश शेलार तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार ठाकूर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार यांनी उरण पनवेल भागातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती दिली. विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे. बारणे यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना असणार आहे.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली. देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. जातीय दंगली झाल्या नाहीत. राम मंदिर, जम्मू-काश्मीर सारखे किचकट प्रश्न रक्ताचा थेंबही न सांडवता सोडवले. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात झाली नसतील, तेवढी विकास कामे मागील दहा वर्षात झाली आहेत. त्यामुळे मोदींवर जनतेचा प्रचंड विश्वास असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची भावना आहे. आठ पदरी जेएनपीटी रोड, अटल सेतू, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रकल्पांनी उरण परिसराचा कायापालट झाला आहे. विरोधी उमेदवाराकडे दाखवण्यासारखे एकही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करीत आहेत, असा आरोपही बारणे यांनी केला.

आमदार बालदी यांनी मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा सादर केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना कोणतेही प्रश्न सोडवण्यात रस नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास कामांना गती मिळाली आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. करंजाडे येथील पाण्याचा प्रश्न सप्टेंबर महिन्यापर्यंत सुटलेला असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना मानणारे प्रत्येक मत खासदार बारणे यांनाच मिळेल, असा विश्वास अतुल पाटील यांनी व्यक्त केला.

अविनाश कोळी यांचेही यावेळी भाषण झाले. समीर केणी यांनी आभार मानले. नीतेश पंडित यांनी सूत्रसंचालन केले.