सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द

0
439

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि. २२) बदल्या करण्यात आल्या. या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची थेट चंद्रपूर येथे करण्यात आलेली बदली रद्द झाली आहे. बुधवारी (दि. २४) याबाबत नव्याने आदेश काढण्यात आले आहेत.

राज्याच्या गृह विभागातर्फे सोमवारी (दि. २२) पोलिस उपअधीक्षक/सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये पिंपरी -चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली. तर वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली झाली. तसेच चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

किशोर आवारे प्रकऱणाचा तपास प्रेरणा कट्टे यांच्याकडे –
किशोर आवारे खून प्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी ‘एसआयटी’ तयार करण्यात आली आहे. सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख आहेत. तसेच, त्यांच्याकडे कुख्यात गुंड अनिल मोहिते मोक्का प्रकरण तपासासाठी आहे. प्रेरणा कट्टे कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी पडत नसल्याचे स्वतः पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील सांगितले आहे. त्यांची बदली रद्द झाल्याने आवारे, मोहिते प्रकरणातील पीडितांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.