सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावं – शरद पवार

0
325

पुणे, दि. १२ (पीसीबी) : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीत मत भिन्नता असल्याची वारंवार चर्चा होत असते. मग त्यामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य नाहीतर शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य, यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया आणि भूमिका बघता महाविकास आघाडीमध्ये मत भिन्नता आहे हे वारंवार स्पष्ट झालं आहे. यावरूनच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी चर्चा या निमित्ताने वारंवार होत असते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नुकतीच एक बैठक पार पडली होती.

शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. बराच वेळ झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत स्पष्टता नसताना शरद पवार यांनी मात्र यावर भाष्य केले आहे. आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावं अशा मताशी आमची चर्चा झाली आहे, त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली. याबाबत अवघ्या दोन वाक्यात शरद पवार यांनी पुण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत हे देखील होते.

त्यानंतर माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता उद्धव ठाकरे थेट मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती.
इतकंच काय महाविकास आघाडीत फूट पडेल असंही दबक्या आवाजात बोलले जात होते. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन महाविकास आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर टीका केली होती.