सर्वोच्च न्यायालयाने मतदानयंत्रामध्ये फेराफार होण्याची शक्यता फेटाळली

0
177

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – आम्ही निवडणुकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट संदर्भातील आमच्या शंकांचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निरसन केले आहे. याबाबत केवळ संशय व्यक्त झाला आहे, या कारणासाठी कोणतेही आदेश देऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मतदानयंत्रामध्ये फेराफार होण्याची शक्यता फेटाळली व यासंदर्भात दाखल याचिकांवरील निकाल राखून ठेवला.

लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच ‘व्हीव्हीपॅट’ची (कागदी पावत्या) पडताळणी होते. त्याऐवजी सर्व व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करणारी याचिका ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म’ (एडीआर) व इतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली आहे. यासंदर्भात न्या. संजीव खन्ना व न्या. दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. खंडपीठाने बुधवारी काही तांत्रिक मुद्दय़ांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत आयोगाने चारही मुद्दय़ांवर भूमिका स्पष्ट केल्यानंतर खंडपीठाने मतदानयंत्राद्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मतपेटीद्वारे मतदान घेण्याची शक्यताही खंडपीठाने फेटाळली. मतदानयंत्र व या यंत्रांना जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमध्ये फेराफार करता येत नाहीत, असे आयोगाने न्यायालयाला सांगितले. त्यावर, ‘एडीआर’च्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी, मतदानयंत्रांच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करता येऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर, निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे निरसन केले असून केवळ शंकेच्या आधारे निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मतदानयंत्रांच्या कार्यप्रणालीमध्ये फेरफार केले जाऊ शकतात वा कार्यप्रणाली नव्याने अपलोड केली जाऊ शकते असा मुद्दा उपस्थित करून मतदानंयंत्रातील संकेतप्रणालीचा स्रोत (सोर्स ऑफ कोड) उघड करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, संकेतप्रणालीचा स्रोत गोपनीयच ठेवला जाईल. अन्यथा त्याचा गैरवापर केला जाण्याचा धोका असू शकतो, असे न्या. खन्ना यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचे पाच प्रश्न व आयोगाची उत्तरे

  • मायक्रो-कंट्रोलर कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये?
  • कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट यांचे स्वतंत्र मायक्रो-कंट्रोलर आहेत. मायक्रो-कंट्रोलरच्या मेमरीमध्ये कार्यप्रणाली अपलोड होते. हे मायक्रोकंट्रोलर सुरक्षित, अनधिकृत एक्सेस-डिटेक्शन मॉडय़ूलमध्ये ठेवलेले असल्यामुळे नियंत्रकांना त्यामध्ये बदल करता येत नाही.
  • कार्यप्रणाली एकदाच प्रोग्राम करता येते का?
  • मायक्रो-कंट्रोलरमध्ये फक्त एकदाच कार्यप्रणाली अपलोड होते. त्यानंतर त्यामध्ये फेरफार करता येत नाहीत.
  • निवडणूक चिन्हे अपलोड करणारी किती युनिट्स आहेत?
  • इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) व भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) या सरकारी कंपन्या मतदानयंत्रांचे उत्पादन करतात. ‘ईसीआयएल’कडे १,९०४ तर, भेलकडे ३,१५४ चिन्हे अपलोड करणारी युनिट्स आहेत.
  • माहिती-विदा किती दिवस साठवून ठेवला जातो?
  • मतमोजणीनंतर ४५ दिवसांमध्ये निकालाविरोधात आक्षेप घेता येतो. त्यामुळे ४६व्या दिवशी आक्षेप नसलेल्या मतदानयंत्रांतील माहिती-विदा नष्ट केला जातो.
  • कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट सील केले जातात का? यंत्रे एकत्र ठेवली जातात की स्वतंत्रपणे? * तिन्ही युनिट्स सील करून एकत्रितपणे सुरक्षित ठेवली जातात.