Pune

सराईत वाहन चोरास अटक; सात दुचाकी जप्त

By PCB Author

May 24, 2023

महाळुंगे, दि. २५ (पीसीबी) – महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि. 21) इंडोरन्स चौकात करण्यात आली.

चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप (वय 36, रा. आळंदी , ता. खेड. मूळ रा. चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार वाहन चोरी होणाऱ्या ठिकाणी पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी इंडोरन्स चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून संशयितरित्या जात असताना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. त्यावरून संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. पुढील तपासात आरोपीने आणखी सहा दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या.

चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप हा सराईत वाहन चोर आहे. याच्यावर बीड, अहमदनगर, पनवेल, पिंपरी चिंचवड शहरात चोरीचे 15 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर. उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार अमोल बोराटे, अशोक जायभाये, युवराज बिराजदार, संतोष काळे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, जमदाडे, शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, बाळकृष्ण पाटोळे, आमोल माटे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, राहुल मिसाळ, शरद खैरे यांनी केली आहे.

कंपनीतील कामगारांना आवाहन

एमआयडीसी हदीतील कंपन्यामधील कामगारांनी दुचाकी वापरत असताना हेल्मेटचा वापर करावा. तसेच कामगारांनी आपल्या दुचाकी कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणीखाली लावाव्यात. दुचाकीला मेटल टायर लॉक लावावे. हॅन्डल लॉक करून दुचाकी पार्क कराव्यात