संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चोरीच्या पाच घटना

0
468

पिंपरी दि.२३ (पीसीबी) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणे, नागरिकां ना जीवे मारण्याची धमकी देणे असे पाच प्रकार घडले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. या सर्व घटना मंगळवारी (दि. २१) देहूगाव, चिंचोली येथे घडल्या आहेत.

सुनील दत्तू म्हस्के (वय २५), विलास हिरामण धोत्रे (वय २५), संतोष सहदेव म्हासळकर (वय २६), नागेश बारकू पवार (सर्व रा. पाथर्डी, जि. अहमदनगर), महिला (वय ३५, रा. नांदेड), रामकृष्ण बबन जाधव, बाळू तुळशीराम जाधव, रामेश्वर आंबादास जाधव, माणिक दौलतराव जाधव (सर्व रा. बीड), महिला (वय ४५, रा. म्हेत्रे गार्डन, चिखली), रतन दादा घनवट (वय २५, रा. साने चौक, चिखली), महिला (वय ३५, रा. नांदेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

देहूगाव येथील मुख्य कमानीजवळ ३० वर्षीय महिला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत असताना एका महिलेसह पाच जणांनी त्यांना घेरले. त्यांच्या गळ्यातील ७२ हजार ९७५ रुपयांचे १३.५२० ग्रॅम वजनाचे मिनिगंठन काढून घेतले. ओरडल्यास महिलेला जीवे मारण्याची आरोपींनी धमकी दिली.

सुशांत विष्णू सूर्यवंशी (वय ३१, रा. परंडवाल चौक, देहूगाव) हे चिंचोली येथील मोकळ्या मैदानात शनी मंदिराच्या बाजूला तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. तिथे आलेल्या पाच जणांनी सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन ६० हजारांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. वरील दोन प्रकरणांमध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

चिंचोली येथे शनी मंदिराजवळ दर्शनासाठी थांबलेल्या ४६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ७३ हजार ९६ रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे मिनिगंठन चौघांनी हिसकावून घेतले. त्यावेळी नागरिकांनी चोरट्यांना पकडले.

गणेश दिनकर टिळेकर (वय ३३, रा. देहूगाव) यांच्या खिशातून ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम काढून चोरटे पळाले. चिंचोली येथे एका महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मिनिगंठन देखील हिसका मारून चोरून नेले. वरील तीन प्रकरणांमध्ये जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यातील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.