पिंपरी, दि. 6 (पीसीबी) – “संतत्व हेच साहित्याचे ध्येय होय! कारण साहित्यिकांना कोणताही जातधर्म नसतो. साहित्य हाच त्यांचा धर्म असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, खेडचे आमदार बाबाजी काळे, संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. शिवाजीराव मोहिते, महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे कार्यवाह सुनीताराजे पवार, पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समिती सदस्य ॲड. माधवी निगडे, स्वागताध्यक्ष वंदना हिरामण आल्हाट, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “माय मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वच पातळीवर बदलला पाहिजे. उपेक्षितांचे जिणे आणि सौभाग्याचे लेणे ल्यालेल्या मराठी भाषेने जगाला विश्वात्मकतेच्या धाग्यात बांधले आणि इतिहासाच्या पानापानावर पराक्रमाचा, वैभवाचा, शालिनतेसह औदार्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला. व्यापाराची, ज्ञान – विज्ञानाची, व्यवसायाची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचे जगात प्रचंड स्तोम असताना मराठीची गळचेपी होऊ नये. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. माय मराठीचा गोडवा साता समुद्रापार पोहोचावा आणि तनामनात तिचा जागर होऊन अतिउच्च शिखरावर ती विराजमान व्हावी!” असे प्रतिपादन केले. डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी, “साहित्य संमेलनातून जाणीवपूर्वक मराठी शब्दांना प्राधान्य द्यावे; तसेच संतसाहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. बाबाजी काळे यांनी, “साहित्य हे समुद्रासारखे अथांग असते. त्याच्या खोलीचे आकलन संमेलनाच्या माध्यमातून होते!” असे मत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी, “अखिल भारतीय संमेलनासारखे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे. हे संमेलन म्हणजे जणू काही प्रकाशाचे बेट आहे!” असे गौरवोद्गार काढले.
उद्घाटन सत्रापूर्वी, ग्रामदैवत श्री नागेश्वरमहाराज मंदिर ते बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी या संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून तसेच छत्रपती शिवाजीमहाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, पारंपरिक वेषातील बालवारकरी यांच्या टाळ – मृदंगाच्या तालावरील ‘ज्ञानोबा – तुकाराम’ या जयघोषात ग्रंथदिंडी मार्गस्थ होताना साहित्यिक, रसिक आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळल्या; आणि शंखनाद केला. दीपप्रज्वलन आणि ज्ञानोबा – तुकोबांच्या प्रतिमांचे पूजन करून चौघडावादनाच्या पार्श्वसंगीतावर संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट यांच्या मातोश्री कौसाबाई बोराटे आणि सासूबाई भामाबाई आल्हाट यांची ग्रंथतुला करण्यात आली. निमंत्रक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून, “ज्ञानोबा – तुकोबांच्या भूमीत आपली संस्कृती अबाधित राहावी आणि मराठी भाषेचे जतन, रक्षण अन् संवर्धन व्हावे या उद्देशातून परिषदेची स्थापना आणि तीन साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे!” अशी भूमिका मांडली. वंदना आल्हाट यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते ‘अक्षर इंद्रायणी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संपादक संदीप तापकीर यांनी स्मरणिकेचे अंतरंग उलगडून सांगताना, नवोदित आणि ज्येष्ठ तसेच स्थानिक साहित्यिकांनी लिहिते व्हावे, हाच प्रयत्न स्मरणिकेतून केला असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांना डाॅ. शिवाजीराव मोहिते यांच्या हस्ते पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, सन्मानचिन्ह, अकरा हजार रुपये, उपरणे आणि पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते. दादाभाऊ गावडे लिखित ‘ताल – भवताल’ या कथासंग्रहाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि पांडुरंग गाडीलकर यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले; तसेच बाबाजी काळे यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्यसंग्रामातील समिधा’ या क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि मोशीतील समस्त ग्रामस्थ यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. संगीता देवकर – थोरात यांनी आभार मानले.