मुंबई, दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना २८ जून रोजी मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आले आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या संजय राऊत यांना २८ जून रोजी दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात अधिकार्यांसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काही क्षणांतच त्यांची खिल्ली उडवली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, “संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांचा गट अपात्रतेबाबत न्यायालयीन लढाई जिंकेल,” असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना ईडी समन्स आल्याने बंडखोर गटातील आमदार भलतेच सुखावले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे यांनीसुध्दा राऊत यांच्यावर कटोर शब्दांत टीका करताना, शरद पवार यांच्या सल्ल्यानेच राऊत हे शिवसेना चालवतात हीच मोठी अडचण असल्याचे म्हटले आहे.