संघ स्वयंसेवक ते राज्यपाल, हरिभाऊ बागडेंचा प्रवास

0
89

मुंबई, दि. २८ : मराठवाड्यातील बडे नेते म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. पाच वेळा आमदार राहिलेल्या बागडे यांची राहणी अत्यंत साधी आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासास सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे. हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल करण्यात आले आहे. नाना म्हणून परिचित असलेल्या बागडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…

शाळेत गेलेले कुटुंबातील पहिलेच
हरिभाऊ बागडे यांना नाना म्हणूनही ओळखले जाते. 17 ऑगस्ट 1945मध्ये त्यांचा जन्म झाला. औरंगाबादच्या चित्तेपिंपळगावात त्यांचा जन्म झाला. औरंगाबादपासून 16 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. बागडे हे शाळेत गेलेले त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. सरस्वती भुवन शाळेतून दहावी पास झाल्यानंतर त्यांनी वडील आणि भावाप्रमाणे शेती कामास सुरुवात केली.

पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी
अत्यंत साधी राहणी ही सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे. पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोषाख. पाच वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्यापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वत:ला झोकून दिलं होतं. शेतकरी असल्याचा त्यांना रास्त अभिमान आहे. म्हणूनच त्यांच्या औरंगाबाद येथील घराला त्यांनी कृषीयोग हे नाव दिलेलं आहे.

पत्रकार म्हणून सुरुवात
वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम सुरू केलं. संघाचं मुखपत्रं असलेल्या साप्ताहिक ‘विवेक’मध्ये त्यांनी काम सुरू केलं होतं. ही 1965-69ची गोष्ट. त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषदाही कव्हर केल्या होत्या. 1967 ते 1972 दरम्यान त्यांनी औरंगाबादमध्ये जनसंघासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं.

आणीबाणीच्या काळात आरएसएस आणि जनसंघाच्या भूमिगत झालेल्या नेत्यांना मदत करण्याचं काम ते करत होते. तसेच जनतेला आणीबाणीच्या काळात दररोज घडणाऱ्या घटनांचीही माहिती देत होते. 1985मध्ये बागडेंनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2014मध्ये ते निवडून आले. 1995 ते 97 दरम्यान ते मंत्री होते आणि 1197 ते 99 दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपददेखिल त्यांनी सांभाळले. बागडे यांनी राजकारणात असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्त्व दिले. त्यानंतर 2014मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्षही झाले. बागडे यांनी ग्रामीण भागात दूध सहकारी सोसायटी सुरू केली. साखर कारखान्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार निर्माण करून दिले. त्यांनी जल संधारण आणि सिंचनाशी संबंधित कामही केलं. ते देवगिरी नागरी सहकारी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक उपाध्यक्षही होते.

ऐकायला का येत नाही, त्याची गोष्ट
हरिभाऊ बागडे यांना कानाने ऐकायला येत नाही. त्यामुळे नाना विरोधकांचं मुद्दाम ऐकत नसल्याचा विरोधकांकडून आरोप होत होता. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विधानसभेत त्याची वाच्यताही केली होती. त्यावर आपल्याला कानाने का ऐकायला येत नाही, याचा किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता. आणीबाणीच्या काळात माझ्याकडे सत्याग्रह काढण्याचे काम होते. दर आठवड्याला मी सत्याग्रह करायचो. दिवस-रात्र फिरायचो. ऊन, वारा, पाऊसही पाहायचो नाही. डिसेंबर महिन्यातील कडक थंडी होती. त्याचा परिणाम झाला. माझ्या कानात बधीर झाल्यासारखे झाले व मी बेशुद्ध पडलो. दोन-तीन दिवस घरीच राहिलो. दवाखान्यात गेलो नव्हतो. त्यामुळे कानाच्या नसा बधीर झाल्या. हे माझ्या जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे. काही लोकांना माहिती नसेल. आणीबाणीच्या प्रसंगाला आता 45 वर्ष झाले, असं त्यांनी सांगितलं होतं.