“संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे!” – प्रा. डॉ. सदानंद मोरे

0
179

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – “संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे असते! संक्रमण काळातील योगदान हे समाजाला दिशादर्शक असते. यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे.” असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी खानदेश मराठा मंडळ सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यक्त केले. राजेंद्र घावटे लिखित आणि पिंपरी – चिंचवड साहित्य मंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित ‘चैतन्याचा जागर’ या ग्रंथरूपी वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. सदानंद मोरे बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, प्रकाशक नितीन हिरवे, लेखक राजेंद्र घावटे, जयश्री घावटे यांची व्यासपीठावर तसेच राज अहेरराव, राजाभाऊ गोलांडे, सुरेश कंक आणि साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्रा. डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवड ही औद्योगिकनगरी एका मोठ्या संक्रमणातून गेली आहे. आज ती साहित्य आणि संस्कृतीची नगरी म्हणूनसुद्धा ओळखली जाते. या स्थित्यंतराला सामोरे जाताना वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेल्या व्यक्तींचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले. अशा पार्श्वभूमीवर एक जागल्या म्हणून राजेंद्र घावटे यांचे साहित्य, समाज, संस्कृती, प्रबोधन याप्रति समर्पण उल्लेखनीय आहे. त्याचेच प्रतिबिंब ‘चैतन्याचा जागर’ या वैचारिक लेखसंग्रहात उमटले आहे! आपल्या चांगल्या परंपरा, सण-उत्सवाच्या संकल्पना आणि राष्ट्र व समाजाचे चिंतन हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.” नितीन हिरवे यांनी, “संयम, समर्पण अन् त्यागी वृत्ती यांचा समन्वय राजेंद्र घावटे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे!” असे मत मांडले. प्रा. तुकाराम पाटील यांनी, “लेखकाला आपले पुस्तक अपत्यापेक्षाही प्रिय असते; साहित्यनिर्मिती ही एखाद्या तपस्व्याच्या व्रतासारखी असते!” अशी लेखन मीमांसा केली. लेखक राजेंद्र घावटे यांनी आपल्या मनोगतातून, “पवना इंद्रायणीचा परिसर, भक्ती आणि शक्तीचे पीठ असलेल्या या नगरीत माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. जीवनातील अनुभव, श्रवणभक्ती आणि वैचारिक बैठक यांची अनुभूती आयुष्याची पुंजी आहे. वाचन व श्रवणभक्तीतून मी घडलो. पद्मभूषण अण्णा हजारे आणि डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासह अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. शेवटपर्यंत शब्दपंढरीचा वारकरी बनून माय मराठीची सेवा करण्याचे वरदान परमेश्वराने मला द्यावे!” असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.

पांडुरंग बलकवडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सामाजिक बांधिलकी अन् वैचारिक प्रगल्भता हे ‘चैतन्याचा जागर’ या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे काम आपल्या देशातील विचारवंतांनी केले आहे. समाजाला वेळोवेळी येणाऱ्या वैचारिक ग्लानीच्या काळात अशा वैचारिक साहित्याने दीपस्तंभासारखे कार्य केले आहे!” असे गौरवोद्गार काढले.

गायत्री आणि शांभवी घावटे या विद्यार्थिनींनी कथ्थक नृत्यातून सादर केलेली गणेशवंदना, दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
जयश्री घावटे यांनी प्रास्ताविकातून, “आपल्या आईकडून राजेंद्र घावटे यांना लेखनाची आणि वडिलांकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाली; परंतु आज त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे!” अशी भावना व्यक्त केली. नंदकुमार मुरडे आणि उज्ज्वला केळकर यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रस्तावनेचे; तर नेहा कुलकर्णी आणि सागर यादव यांनी संग्रहातील ‘माझा सखा श्रावण’ या ललितलेखाचे अभिवाचन केले. पिंपरी – चिंचवड साहित्य संवर्धन समितीच्या वतीने विशेष मानपत्र देऊन राजेंद्र घावटे यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी – चिंचवड साहित्य मंच, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, साहित्य संवर्धन समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि मित्रमंडळ, श्री शाहू वाचनालय, शिवतेज प्रतिष्ठान या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना घावटे यांनी आभार मानले.