श्वान परवाना आता ऑनलाईन मिळणार

0
619

पिंपरी दि. ४(पीसीबी) – श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना आज (गुरुवार) पासून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन श्वान परवाना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाळीव प्राण्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी डॉगशेल्टर सूरू करण्यात आले आहेत.परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये, अशी शासन नियमात तरतुद आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो. यामध्ये श्वान मालकास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपुर्ण प्रक्रिया करुन घ्यावी लागते. सद्यस्थितीत केवळ 450 इतक्या पाळीव श्वानांचे विभागातुन श्वान मालकांनी परवाने घेतले आहेत.

श्वान परवाना प्राप्त करण्याचे प्रमाण कमी असून त्यास परवाना प्रकिया अधिक सुलभ करुन दिल्यास श्वान मालकांचा प्रतिसाद वाढण्यास मदत होणार आहे. ऑनलाईन परवान्याची कायदेशीर मुदत परवाना प्राप्त झाल्यापासुन एक वर्षापुरती असेल. दरवर्षी परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहील. वेळोवेळी ठरविलेले शुल्क अदा केल्यानंतर अटी व शर्तीस अधीन राहुन परवाना देण्यात येईल. परवाना धारकाने प्राप्त परवाना सोबत बाळगणे आवश्यक असून प्राधिकृत अधिका-याने मागणी करताच सादर करणे आवश्यक राहील. ज्या श्वानास परवाना दिलेला आहे तो श्वान पिसाळलेला अथवा तसा संशय असल्यास परवाना धारकाने सदर बाब पशुवैद्यकीय विभागास तात्काळ लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

श्वानास रेबीज लसीकरण करणे बंधनकारक राहील. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर श्वानास मोकळे सोडता कामा नये. तसेच सदर श्वानापासून इतरांना दुखापत होण्याची शक्यता परवाना धारकास वाटत असल्यास सदर श्वानास त्याने मुस्के घालण्याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक आरोग्याचे व पर्यावरणाचे दृष्टीने आपल्या श्वानामुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही, याची परवाना धारकाने दक्षता घ्यावी अन्यथा श्वान मालकास पाचशे रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीचे आणि रहदारीचे ठिकाणी, सार्वजनिक बागेमध्ये श्वान साखळी व्यतिरिक्त (मोकळा) सोडू नये.

तसेच नागरिकांना भुंकण्याचा किंवा अंगावर धावून जाण्याचा, चावण्याचा उपद्रव होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सह कुत्र्यावरील कर उपविधी यामधील नियम व तरतुदी परवाना धारकांवर बंधनकारक राहतील. कोणत्याही व्यक्तीने परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये. परंतू परवाना घेतला असेल आणि त्याचे नुतनीकरण केले नसल्यास विना परवाना श्वान पाळला आहे असे समजण्यात येऊन उक्त नियमानुसार दंडात्मक कारवाईस संबंधित व्यक्ती पात्र राहील. सदरचा परवाना घेतल्यानंतर मानवी आरोग्यास तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणावरून मनपाकडे तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करणे आणि/किंवा दिलेला परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला असेल.