श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने पुन्हा खासदार होतील – उद्योगमंत्री उदय सामंत

0
456

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – खासदार श्रीरंग बारणे यांच्यासारखी व्यक्ती खासदार होणे ही काळाची गरज आहे. दीड महिन्यानंतर श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपात मावळ लोकसभा कोणाच्या पदरात पडणार हे अद्याप ठरलेले नाही, अशाही परिस्थितीत सामंत यांनी एक प्रकारे बारणे यांची उमेदवारी घोषित केली आणि जिंकण्याची हमी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ आहे.

दै. सकाळ तर्फे बारणे यांच्यावर कॉफिटेबल बूक तयार करण्यात आले आहे, त्याचे प्रकाशन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, खासदार श्रीरंग बारणे, भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद उपस्थित होते.

मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात खासदार बारणे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, देशाच्या संसदेत अशा व्यक्तींची गरज आहे. उद्या लोकसभा निवडणूक प्रचाराला मला त्यांनी बालोवले तरी मी नक्की येईल. मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत खसादार बारणे यांनी कसा पाठपुरावा केला त्याचे दाखले मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

पवना, इंद्रायणी नदी सुधार –
पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाबद्दल बारणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. यापूर्वी अनेकजण येऊन गेले त्यांचा दृष्टीकोन काय होता माहित नाही, पण बारणे यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वीच या विषयावर महापालिकेत बैठक घेतली. आम्ही या प्रकल्पासाठी तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च करतोय. आता त्या कामाचा डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकिच्या आधी त्याचे टेंडर होईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.