शैक्षणिक संस्थांच्या ‘असहकार’ भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना बक्षीस योजनेचा लाभ घेण्यास येताहेत अडचणी

0
304

पिंपरी दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्था विद्यार्थ्याना बोनाफाईड, ओळख पत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शैक्षणिक संस्थांना सूचना देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचे अर्ज भरताना बोनाफाईड किंवा शाळेचे ओळख पत्र अनिवार्य आहे. परंतु, अर्ज भरण्यास आलेल्या पालकांनी शाळेकडून बोनाफाईड अथवा ओळखपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सांगितले. तर, काही शाळांनी गेल्या दोन वर्षापासून ओळखपत्रच वाटप केले नसल्याचे सांगितले.

त्यामुळे बहुतेक विद्यार्थी या योजने पासून वंचित राहू शकतात. ही बाब गंभीर असून विद्यार्थी हक्काची पायमल्ली करणारी आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थानी विद्यार्थ्यांना बोनाफाईड अथवा ओळखपत्र देण्याबाबत प्रशासनाच्या वतीने सूचना देण्याबाबत गांभिर्याने विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.