ठाणे, दि. २६ (पीसीबी) – मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोडपटले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला कडाडून विरोध केला जातोय. या सर्व घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे म्हस्के यांनी आपल्या ट्विटमध्ये जाहीर केले आहे.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडखोरीचे काही ठिकाणी समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एक संदेश जारी केला असून आपला लढा हा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरीता समर्पित आहे. आपला एकनाथ संभाजी शिंदे,” असे शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.