शिवसेनेची धगधगती ‘मशाल’ कायम

0
277

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धगधगती ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले होते. पण, या पक्ष चिन्हावरूनही वाद निर्माण झाला. पण, दिल्ली न्यायालयाने शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळली आहे.

‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाला निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेतला होता. त्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने यापूर्वी आम्हाला मशाल चिन्ह दिले होते.

हे चिन्ह शिवसेनेला दिल्यास आमच्या मतांवर परिणाम होईल, असा दावा करत समता पक्षाचे अध्यक्ष उदय मंडल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आज दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय नरुला यांच्यासमोर पूर्ण झाली. दिल्ली न्यायालयाने समता पक्षाची याचिका फेटाळली.

आक्षेप का घेतला?-
‘मशाल’ हे आमचे चिन्ह आहे. आमचा पक्ष बंद नाही, आम्ही वेळोवेळी निवडणूक लढवत आहोत. आम्ही बिहार निवडणुकीचीही तयारी करत आहोत. आमचे चिन्ह शिवसेनेकडे गेले, तर कोणत्या पक्षावर निवडणूक लढवणार? असा सवाल समता पक्षाने याचिकेत विचारला होता. मात्र आता न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून आता शिवसेनेची मशाल धगधगतीच राहणार आहे.