“शिवसेनेची जास्त ताकद असलेल्या जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने लादले”

0
265

अकोला, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना निधी कमी देऊन त्यांची कोंडी करण्यात येत होती. अनेक जिल्ह्यात शिवसेनेची जास्त ताकद असताना पालकमंत्री मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे लादले, अशा शब्दांत बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी नाराजी व्यक्त करून महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यामुळे आमदारांच्या बंडानंतर आता खासदारही आपल्या मनातील भावना व्यक्त करत असल्याचे व खासदारांमध्येही आघाडी सरकारबद्दल नाराजी असल्याचे चित्र समोर आले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साध्या स्वभावाचा राष्ट्रवादी व काँग्रेसने गैरफायदा घेतला. सत्तेचा उपयोग याच पक्षांना अधिक प्रमाणात असल्याने देखील शिवसेना आमदार नाराज होते. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची मुळीच इच्छा नव्हती. राष्ट्रवादीच्या आग्रहामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले, असे खासदार जाधव यांनी म्हटले आहे. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला ईडी, सीबीआयची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात विरोधी पक्षांची भूमिका वठवावी लागत असल्याचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. सध्या शिवसेनेतच कायम आहे. खासदार असल्याने कामानिमित्ताने दिल्लीवारी सुरू असते. शिवसेनेतील सर्व लवकरच सुरळीत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.